वाशिम - स्मशानभूमित भूत, प्रेत, आत्मा भटकत असतात, अशी भिती अनेकांच्या मनात आजही घर करून आहे. मात्र, मृत्यूनंतर अंत्यसंस्कार होणाऱ्या पांगरी नवघरे येथील अशाच एका स्मशानभूमीत काही युवकांनी चक्क डी . जे . वाजवून तथा शवदाहिनीला विद्यूत रोषणाई करून आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा केला. लोकांच्या मनातून स्मशानभूमी विषयीची भीती घालविण्यासाठी राबविण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.
एका युवकाचा ३० डिसेंबरला वाढदिवस होता. तो इतरत्र कठेही साजरा न करता स्मशानभूमीतच साजरा करण्याचा निर्णय रामेश्वरसह त्याच्या मित्रांनी घेतला. त्यानुसार, जय्यत तयारी करून गावापासून थोड्या अंतरावर असलेल्या स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात आली. इतकेच नव्हे ; तर झाडे आणि शवदाहिनीवर विद्युत रोषणाई करण्यात आली. सोबतच स्मशानभूमीत सायंकाळच्या सुमारास डी . जे . वर गाणी लावून मोठ्या थाटामाटात केक कापून रामेश्वरचा वाढदिवस साजरा करण्यात आला.