वर्धा - सगळ्यात जास्त वापरले जानारे गॅजेट म्हणजे मोबाईल. हाच मोबाईल एकदा का हरवला तर पुन्हा मिळेल असा विचारही केला जाऊ शकत नाही. जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातून चोरी गेलेले तब्बल 52 मोबाईल परत करण्यात आले आहेत. मागच्या सहा महिन्यात हरवलेले हे मोबाईल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडून देण्यात येत आहे.
जानेवारी 2019 पासून वर्धा जिल्हयातील मोबाईल गहाळ झाल्याच्या एकुण 198 तक्रारी सायबर सेल, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा येथे प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने सायबर सेल, वर्धा यांनी पुढाकार घेवून जानेवारी 2019 ते आजपावेतो एकुन 52 मोबाईल हस्तगत करून ते मोबाईल धारकांना परत करण्यात आले आहेत.
सदर मोबाईल वर्धा जिल्ह्यातून तसेच आजुबाजूच्या जिल्ह्यातून आणि काही मोबाईल इतर राज्यातून हस्तगत करण्यात आले.यामध्ये महागडे मोबाईल असल्याचे समोर आले. आज मोठया प्रमाणात कॉलेज युवक-युवती मोबाईलचा सर्रास वापर करतात. बरेचदा वापरलेले मोबाईल किंवा एक दोन महिने जुने असलेले मोबाईल कमी किमतीत मिळत असल्याने सहज विकत घेतले जातात. मात्र हे मोबाईल घेतांना खासकरून अनोळखी व्यक्तीकडून घेताना खात्री करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बरेचदा हे मोबाईल घेतले जातात नंतर मात्र चोरीचे असल्याचे तपासा दरम्यान पुढे आले आहे.
बरेचदा चोरीचे मोबाईल ऑनलाइन विक्री होत असल्याचे सुद्धा पुढे आले आहे. त्यामुळे मोबाईल खात्रीशीर किंवा ओळखीच्या व्यक्तीचे नसल्यास घेने टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. यातून बरेचदा फसवणूक होण्याची शक्यता आहे. शिवाय ऑनलाइन फसवणूक सुद्धा होऊन आर्थिक भुर्दंड बसू शकतो. त्यामुळे योग्य काळजी घेणे हाच एक पर्याय असल्याचे जाणकार व्यक्तींकडून सांगितले जात आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांचे निर्देशाप्रमाणे सायबर सेलचे दिनेश बोथकर, निलेश कट्टोजवार, अनूप कावळे, अक्षय राऊत, अभिजीत वाघमारे यांनी हे मोबाईल परत मिळवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.