वर्धा - वायगाव येथील महेश बळीराम कुंभारे यांनी बँकेत पॉलिसी काढली. पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना याचा मोबदला मिळणार होता. मात्र, त्यावरचे कमिशन एजंटला मिळू नये, अशी बतावणी करत लोकांना गंडवणाऱ्या एका टोळींने कुंभारे यांना तब्बल २९ लाख रुपयांना लुटले आहे. या फसवणूक करणाऱ्या दिल्लीच्या फेक कॉल सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकत ३ जणांना अटक केली. यात कॉलसेंटर चालवण्यासाठी लागणारे साहित्य तसेच लाखो लोकांचे फोन नंबरची यादीसह रोख २ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कुंभारे हे हार्डवेअरचा व्यवसाय करतात. त्यांनी एचडीएफसी स्टॅण्डर्ड लाईफ इन्शुरन्स पॉलिसी २०१२ मध्ये काढली होती. पॉलिसीची मुदत संपणार असल्याने त्यांना ४ लाख मिळणार होते. याच दरम्यान, त्यांना विमा कंपनीतून बोलत असल्याचे सांगणारा फोन आला. यावेळी पॉलिसी नंबर, एजंट कोड नाव, अशी खात्री पटणारी माहिती त्यांनी सांगितली. त्यांनीही माहिती बरोबर असल्याने विश्वास ठेवला. कमिशन वाचवण्यासाठी पैसे भरण्यास सांगितले. तसेच विशेष शास्त्री नाव सांगत त्यावर त्यांना पॉलिसी मॅच्युअर होणार असल्याने यावर ५३ हजाराचे कमिशन एजंटला मिळणार, असेही सांगितले. पण यासाठी पुढील दोन इंस्टॉलमेंट तुम्ही थेट कंपनीला भरल्या तर हे पैसे तुम्हाला परत मिळतील, असे सांगण्यात आले. यासाठी कुंभरे यांनी १४ हजार भरले. यानंतर एका मागून एक विविध कारणे सांगत पैसे मागत राहिले. कुंभरे त्यांच्या बोलण्यात अडकल्याने भरलेले पैसे वाचविण्याच्या नादात त्यांना चक्क २९ लाख रुपयांना फसवण्यात आले.
आपण फसले गेलो आहे, हे कुंभरे यांना समजल्यानंतर त्यांनी देवळी पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीवरुन तपास करताना सायबर सेल, स्थानिक गुन्हे शाखेने शोध सुरू केला. ज्या अकाउंटमध्ये पैसे टाकण्यात आले. त्याची माहिती घेतली असता दिल्लीतून हा कारभार चालत असल्याचे पुढे आले आहे. यात मुख्य आरोपी भानुप्रताप ठाकुर हा पितमपुरा, न्यू दिल्ली येथे एसपीसी सोल्युशन या नावाच्या दुकानाचा आडून कॉल सेंटर चालविताना पोलिसांना आढळला. त्यानंतर पोलिसांनी प्रभासकुमार श्रीनारायणदास कुमार, मोहनकुमार नरेंद्रकुमार शुक्ला आणि भानुप्रताप लक्ष्मीनारायण ठाकुर या ३ जणांना दिल्लीतून अटक करण्यात आली.
विशेष म्हणजे या पैशाचा व्यवहार करण्यासाठी हे आरोपी ठराविक रक्कम देत इतर व्यक्तीचे बँक खाते भाडे तत्वावर घेत असत. ते ज्यांची फसवणूक करत आहेत त्याला या अकाऊंटवर पैसे टाकायला सांगून एटीएमच्या साह्याने हे पैसे काढून घेत, अशा प्रकारे हा सर्व गोरखधंदा चालत असल्याचे तपासात समोर आले आले. पोलिसांना अशाच एका खात्यात साधारण ३ कोटी रुपयांचे व्यवहार मिळालेत. यामुळे हा फसवणुकीचा आकडा इतर खाते मिळाल्यास अनेक पटीने वाढण्याची शक्यता आहे.