वर्धा - भरधाव कार रस्त्याच्या कडेला कोसळून तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (शुक्रवार) सकाळी 7 वाजता घडली. हा अपघात नागपूर - अमरावती महामार्गावर चिस्तुर गावाजवळ घडला. यावेळी कारने पलटी खाल्ल्याने कार पूर्णतः चक्काचूर झाला होता. या अपघातात सुदैवाने एकजण सुखरूप वाचला आहे.
अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला -
अमरावतीवरून चार जण कारने नागपूरला जात होते. यावेळी तळेगावलगत चिस्तुर शिवारात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या कडेला नालीत आदळली. यावेळी हा अपघात इतका भीषण होता की कार रस्त्याच्या कडेला दूरवर जाऊन पलट्या खात पडली. या अपघातात अमित गोयते, शुभम गारोडे, आशिष माटे या तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात शुभम भोयर हा सुखरूप वाचला. अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. एकाचा मृतदेह झाडावर अडकला होता तर दुसरा गाडीत अडकला होता. तिसरा मृतदेह बाजूला पडून होता.
भरधाव कारवरील ताबा सुटल्याने झाला अपघात -
घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक पवन भांबुरकर, जमादार राजेश साहू, सुधीर डांगे, श्याम गहाट, राहुल अमोने यांनी मृतदेहांना बाहेर काढत उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. यामध्ये जळगाव येथील युवक कादर खान यांनी व बाकीच्या युवकांनी पोलिसांना मोठी मदत केली. भरधाव वाहनवरून ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.