वर्धा - राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यांमुळे सरकारवर दबाव वाढल्याने मदत जाहीर करण्यात आली. पण अजूनही पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही. त्यामुळे हे आघाडीचे सरकार म्हणजे बोलघेवडे सरकार आहे. केवळ घोषणा करतात, पूर्ण करत नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली. ते वर्धा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
संजय राऊत यांनी मुहूर्त न शोधता, यादी देऊन टाकावी-
भाजपाच्या नेत्याचा कारभार स्पष्ट आणि स्वच्छ आहे. हे जनतेला माहित असल्याने भाजपाला नेहमी जनाधार राहिला आहे. तसेच संजय राऊत यांनी यादी देऊ असे बोलून चार दिवस झाले, त्यामुळे त्यांनी आता मुहूर्त न शोधता यादी देऊन टाकावी, जास्त उशीर करू नये, अशी खोचक टीकाही प्रवीण दरेकर यांनी केली.
भारतीय जनता पक्षाला कुठलीही कारवाई करण्याची गरज नाही. ईडी ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे कोणाची तक्रार असेल म्हणून कारवाई झाली, उगाच काही कोणी कारवाई करत नाही. तसेच लहर आली म्हणून करावाई केली, असे होत नाही. शेवटी अहवाल कोर्टाला देतात आणि ते निर्णय लावतात, असेही दरेकर म्हणाले.
स्वताच्या कर्माने हे सरकार कोसळणार-
या सरकारमध्ये संवाद नाही तसेच एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. या गोष्टीचा कधीतरी शेवट होईल आणि हे सरकार नक्कीच कोसळेल. विधान परिषदेचा निकालानंतर जनतेचा कौल समोर येईलच. जेव्हा हे सरकार कोसळेल तेव्हा भाजपा सक्षम पर्याय म्हणून चांगले सरकार देऊ शकेल, असेही ते म्हणाले.