वर्धा - दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी देशवासियांना संबोधित करताना 'एक देश, एक संविधान'नंतर आता 'एक देश, एक निवडणूक'वर विचार करण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. पाच वर्षात एकदाच सर्व स्तरावर निवडणुका घेतल्यास विकासाला याचा फायदा होईल, असे म्हणत राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी समर्थन जाहीर केले. 73 व्या स्वातंत्रदिनी आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमानंतर ते येथे पत्रकारांशी बोलत होते.
पाच वर्षांच्या कार्यकाळ पाहता गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक निवडणुका होतात. यापेक्षा दर पाच वर्षांनी एकाच वेळी ग्रामपंचायतपासून खासदारकीपर्यंतच्या सर्व निवडणूक दोन महिन्यांचा कालावधी लागला तरी चालेल फक्त ते महिने निवडणुकीसाठी ठेवावे. तसेच या दोन महिन्याच्या कालावधीत एकदा सगळ्या निवडणुका संपवायच्या आणि पाच वर्ष शांततेत काम करायचे, असेही ते म्हणाले.
दरवर्षी कोणती ना कोणती निवडणूक जाहीर होते आणि लोक त्यात गुंततात. आचारसंहितेमुळे विकास कामांना खीळ बसते. त्यामुळे अनेक काम प्रभावित होतात. त्यामुळे दोन महिने निवडणुका घ्यायच्या. त्यानंतर पाच वर्षे निव्वळ विकासकामे करायची हे धोरण आपण स्वीकारायला पाहिजे असल्याचे म्हणत सदाभाऊ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'वन नेशन, वन इलेक्शन' याला पाठिंबा दर्शवला.