वर्धा - कोरोनाच्या संसर्गामुळे बंद असलेली मंगल कार्यालये उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मंगल कार्यालयांमध्ये लग्न समारंभ घेण्यास परवानगी असेल. मात्र या लग्नात दोन्ही कुटुंबातील केवळ ५० लोक उपस्थित राहू शकतील, असे आदेश जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिले आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने लॉकडाऊन घोषित केले. त्यामुळे अनेक इच्छुकांचे विवाह पुढे ढकलले गेले तर काहींनी मात्र मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लॉकडाऊनमध्ये लग्न उरकले. या लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका विवाह समारंभावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायांना बसला. यामध्ये मंगल कार्यालयांचाही समावेश होता. आता नवीन आदेशामुळे या व्यावसायिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. यासाठी परवानगी देण्याचे अधिकार तहसिलदार तथा ईन्सिडन्ट कंमाडर यांना दिले आहे. सोबतच शासनाने घालून दिलेल्या अटींचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
वधु आणि वर वर्धा जिल्ह्यातील असेल तर विवाहाकरीता 50 व्यक्तींच्या उपस्थितीसाठी परवानगी मिळणार आहे. पैकी एखादा पक्ष दुसर्या जिल्ह्यातून विवाहासाठी वर्धा जिल्ह्यात येत असेल तर फक्त 10 लोकांनाच जिल्ह्यात येण्याची परवानगी मिळेल. त्याचप्रमाणे कंटेनमेंट झोनमधील व्यक्तींना विवाहासाठी येण्यास परवानगी देण्यात येणार नाही. तसेच विवाहाकरीता 5 लोकाचे बँडपथक वापरता येईल.
मंगल कार्यालयांना 'या' अटींचे करावे लागणार पालन -
मंगल कार्यालय सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत सुरू राहतील. मंगल कार्यालय प्रत्येकवेळी तर काउंटर हे दर तीन तासांनी निर्जंतुकीकरण करावे लागतील. सोबतच हात स्वच्छ धुण्यासाठी हँडवाश आणि समाजिक अंतर, आणि थर्मल डिटेक्टर ठेवावे लागणार आहे. मंगल कार्यालयाच्या देखरेखीच्या कामाकरीता 10 कर्मचारी, मजूर ठेवता येईल. कर्मचाऱ्यांना ठेवता हात-मोजे यासह अन्य काळजी घ्यावी लागणार आहे. मंगल कार्यलयात गर्दी होऊ नये, याची काळजी घ्यावी लागणार आहे. गर्दी केल्यास पोलिसांना कळवावे अन्यथा नियम मोडल्यास सात दिवस मंगल कार्यालय पुन्हा सील करण्यात येणार आहे.
व्यवसाय सुरू ठेवण्यापेक्षा बंद ठेवण्यात अधिक फायदा असल्याचा सूर व्यावसायिकांमध्ये दिसून येत आहे. केवळ पन्नास लोकांना परवानगी दिली जाणार असल्याने मंगल कार्यालयाच्या भाड्यात नफा मिळण्याची शक्यता कमी आहे.