वर्धा - कोरोना रुग्णांच्या उपचारांचा महात्मा ज्योतिबा फुले जअनारोग्य योजनेत समावेश करण्यात आला होता. पण, लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना दिवसा 700 रुपये द्यावे लागत होते. सध्या रुग्णसंख्या वाढत असल्याने पुढील नियोजन पाहता सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयाला अधिग्रहीत करण्यात आले आहे. हा खर्च सरकारी तिजोरीतून होणार असल्याने रुग्णांना एकही रुपया द्यावा लागणार नाही.
जिल्ह्यात कोरोना रुग्ण कस्तुरबा गांधी रुग्णालय, सेवाग्राम व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) येथे भरती करण्यात येतात. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये कोरोनाबाधित असल्यास पण लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना ठराविक 700 रुपये रोज खर्च आकाराला जात होता. पण, आता मात्र नव्याने आदेश काढत महात्मा फुले जन आरोग्य योजनेत असणाऱ्या रुग्णांचा समावेश होत नसल्याने दोन्ही रुग्णालये अधिग्रहीत करण्यात आली आहेत. याचा खर्च शासकीय तिजोरीतून होणार आहे.
हेही वाचा - उत्तर महाराष्ट्राला दिलासा; गिरणा धरणात ८५ टक्के पाणीसाठा
सेवाग्राम आणि सावंगी मेघे हे दोन्ही रुग्णालयांना शासकीय कोविड रुग्णालय म्हणून अधिग्रहीत केलेले आहे. शासनाच्या निर्देशानुसार या रुणालयातील कोरोना उपचारासंदर्भात सर्व खर्च भागविण्यासंदर्भात राज्य शासनाचे निर्देश आहे. शासकीय दराप्रमाणे यामध्ये जेवण, औषधे आणि इतर उपचारांचा यात समावेश आहे. दोन्ही रुग्णालयांनी रुग्णांकडून उपचार, औषधे आणि तपासणीसाठी कोणतेही शुल्क आकारू नये, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. परंतु, खासगी खोलीमधील रुग्णांकरीता आणि वर्धा जिल्ह्याच्या बाहेरील रुग्णांकरीता तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील पात्र रुग्णांकरीता सदर निधी मिळणार नाही, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
हेही वाचा - जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण