वर्धा - हिंगणघाट येथील महिला वनरक्षकाला ३ हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई कलोडे चौकात करण्यात आली. बिल्डिंग मटेरियलच्या व्यवसायिकास मुरूमचा ट्रक कॅन विभागाच्या हद्दीतून जाऊ देण्यासाठी लाचेची मागणी केली होती. लता शंकर भोवते (वय ३२) असे या महिला वनरक्षकाचे नाव आहे.
लता भोवते या वनरक्षकाच्या अखत्यारीत उमरी (येडे) हा विभाग येतो. याच परिसरातून मटेरियल व्यवसायिकांचा ट्रॅक्टर जंगल परिसरातून नेऊ देण्यासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची भोवतेने केली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार केली.
व्यवसायिकाच्या तक्रारीवरून पाच हजारांच्या ऐवजी ३ हजारांची लाच देण्याचे ठरले. त्यानंतर लाचलुचपत विभागाने हिंगणघाटला सापळा रचला. या सापळ्यात ३ हजार रुपयांच्या ५०० रुपयांच्या सहा नोटा लता शंकर भोवते यांनी घेतल्या. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी महामार्गावरील कलोडे चौकातून महिला वनरक्षकास ताब्यात घेतले.
एसीबीचे नागपूर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार, एसडीपीओ विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सुहास चौधरी यांच्या पथकातील रोशन निंबोळकर, अतुल वैद्य, प्रदीप कूचनकार, सागर भोसले, अपर्णा गिरीजापुरे, स्मिता भगत, पल्लवी बोबडे, राजू शाहू आदींनी कारवाईला पार पाडले.