वर्धा: मिळालेल्या माहितीनुसार, स्वस्त धान्य दुकानदारांना शासनाकडून मिळणाऱ्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या धान्य पुरवठ्यासाठी कायदेशीर कमिशन मिळते. परंतु याकरिता जिल्हा पुरवठा अधिकारी स्वस्त धान्य दुकानदारांकडून आपल्या दलालामार्फत मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल करत असल्याची चर्चा सुरू होती. याच विषयामुळे अनेकजण त्रस्त होते. त्यामुळे एका तक्रारदाराने या संदर्भात वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे.
लाच घेताना रंगेहात अटक: तक्रारदार यांची तालुक्यात दोन स्वस्त धान्यांची दुकाने आहेत. त्याचे कमिशन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी अडवून ठेवले होते. यासोबतच त्यांच्याकडील सात महिन्यांचा थकीत हप्ता असे एकूण ५० हजार रुपये लागतील, अशी तंबी दुकानदाराला देण्यात आली होती; परंतु दुकानदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी काल सापळा रचून कारवाई केली. यामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासाठी दलाली करणाऱ्या खासगी इसमाच्या मार्फत वर्धा येथील विश्रामगृहात २० हजारांची लाच घेताना दोघांनाही रंगेहाथ अटक करण्यात आली.
अधिकारीच निघाले दलाल: यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला घटनास्थळी वेगवेगळ्या बंद लिफाफ्यात ५ लाख ६० हजार ३६० रुपये मिळून आले. स्वस्त धान्य दुकानदारने जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासाठी दलाली करीत असल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. मोठे पदस्थ अधिकारीच लाच घेत असल्याने आता जिल्ह्यात हा चर्चेचा विषय बनला आहे. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही कारवाई नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर पोलीस अधीक्षक मधुकर गिते, यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक अनामिका मिर्झापूरे, पोलीस निरीक्षक प्रविण लाकडे, सारंग बालपांडे, गिता चौधरी, अस्मिता मेश्राम, आशु श्रीरामे, करुणा सहारे, विकास गंडेवार आदी कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.
बुलडाणा जिल्ह्यातही कारवाई: बुलडाणा जिल्ह्यातही उपजिल्हाधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती. तब्बल एक लाख रुपयांची लाच शेतकऱ्याकडून स्वीकारताना बुलडाण्याचे भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांना एसीबीने 28 डिसेंबर, 2022 रोजी रंगेहाथ अटक केली होती. त्यांच्यासोबत या प्रकरणात लिपीक नागोराव खरात, मोताळा येथील वकील अनंथा देशमुख यालाही ताब्यात घेण्यात आले होते. जिगाव प्रकल्पामध्ये हिंगणा इसापूर येथील एका शेतकरी तक्रारदाराच्या वडीलांची जमीन भूसंपादीत करण्यात आली होती. मात्र, मोबदल्याची रक्कम तक्रारदाराच्या चुलत्याच्या खात्यावर जमा झाली होती. भूसंपादन विभागाची चुक दुरुस्त करण्यासाठी चक्क शेतकऱ्याकडेच लाचेची मागणी करण्यात आली होती.
हेही वाचा: Kolhapur News: उपोषणाला बसलेल्या इंजिनीअर तरुणाची तब्येत ढासळली