वर्धा : वर्धा येथील महात्मा गांधी साहित्य नगरी, स्वावलंबी विद्यालय परिसरात सुरु असलेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अखेरच्या दिवशी शुभारंभाच्या सत्रात फडणवीस बोलत होते. मराठीमध्ये साहित्य संमेलनाची उज्वल अशी परंपरा आहे. मराठीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, विविध विचारांचे साहित्य संमेलने उत्साहात पार पडतात. साहित्य संमेलन हे उणीवांवर बोट ठेवण्यासाठी नव्हे, तर जाणीवा समृद्ध करणारे असते. राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीतील प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावरून शुक्रवारी संमेलनाच्या उद्घाटनाचा मुख्य सोहळा पार पडला होता. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते.
राजकारणातील साहित्य, राऊतांवर टीका : साहित्याच्या व्यासपीठावर राजकारणी कशाला? असा आक्षेप नेहमी घेतला जातो. मात्र, सकाळी टीव्ही लावल्यावर जे साहित्य राजकारण्यांच्या तोंडून ओसंडून वाहताना दिसते, त्यावरून आम्ही साहित्यिक नाही, असे कुणी म्हणू शकत नाहीत. आमच्यातही बरेच साहित्यिक आहेत. आम्हीच साहित्यिकांची प्रेरणा आहोत. म्हणून व्यासपीठावर मिळणारी लहानशी जागा सुद्धा आम्ही व्यापून घेतो, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
'वरदा'चे प्रकाशन, साहित्य संघाला १० कोटी : वर्तमानात नवनिर्मित साहित्याला उंची आणि खोली नाही. मात्र भविष्यात ती मिळेल, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी महोत्सवानीनिमित्त आयोजित ९६ व्या साहित्य संमेलनाची स्मरणिका 'वरदा'चे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांनी केले. विदर्भ साहित्य संघाने मराठी साहित्य आणि साहित्यिकांचे संवर्धन करण्याचे कार्य स्वातंत्र्यपुर्व काळापासून केले आहे. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त शासनाकडून १० कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
समारोपीय कार्यक्रमला नितीन गडकरी :अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वर्धा येथे सुरू असलेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज शेवटचा दिवस आहे. साहित्य संमेलनाचा समारोपीय कार्यक्रम व खुले अधिवेशन आचार्य विनोबा भावे सभामंडपात होणार आहे. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, स्वागताध्यक्ष दत्ता मेघे, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे, विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे.