वर्धा- जिल्ह्यात चौघांनी योग्य उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. सावंगी मेघे आणि सेवाग्राम रुग्णालयातून या रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच 3 महिलांचा अहवाल कोरोनाबधित असल्याचे निदान झाले. यामध्ये एक वर्धा, एक आर्वी आणि एक हिंगणघाट येथील महिलांचा समावेश आहे.
वर्धा जिल्ह्यात शुक्रवारी 9 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर शनिवारी 3 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. मागील तीन दिवसात कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील जवळपास 20 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे अहवालात पुढे आले आहे. यामध्ये हिंदनगर रुग्णाच्या घरातील 65 वर्षीय महिला, आर्वी उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्याची पत्नी (वय 50 वर्ष) आणि हिंगणघाट येथे चेन्नईहून आलेली (वय 27वर्ष) महिला कोरोना बाधित असल्याचे निदान झाले.
सुट्टी मिळालेल्या 4 जणांना दोन दिवस संस्थात्मक विलागीकरनात ठेवण्यात येणार आहे. प्रतिबंधित क्षेत्र पूर्ववत झाल्यास त्यांना घरी सोडण्यात येईल अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. या रुग्णासहित जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या 71 झाली आहे. तर 42 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच 26 जणांवर उपचार सुरू आहेत.