ठाणे - गरीब, गरजू महिलांना वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलणाऱ्या एका महिला दलालाला डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात अटक करण्यात आली आहे. अवैध मानवी वाहतूक प्रतिबंधक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत ही कारवाई केली आहे. पथकाने अटक केलेल्या महिलेचे नाव संगिता उर्फ पूजा उर्फ राणी पुणेष आहिरे (वय ३०) असे आहे. संगीताने दोन महिलांना वेश्याव्यवसायासाठी बळजबरीने आपल्यासोबत ठेवले होते, त्या दोन्ही महिलांची पोलीसांनी सुटका केली आहे.
पैशाचे अमिष दाखवून संगिताने २ महिलांना शरीरसंबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले. ग्राहकांकडून रोख रक्कम स्वीकारुन त्या मोबदल्यात बळीत महिलांकडून ती वेश्याव्यवसाय करून घेत होती. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटाच्या सुमारास परिसरात सापळा रचला आणि महिला दलाल संगिता उर्फ पुजा उर्फ राणी पुणेष आहिरे हिला अटक केली.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकातील महिला पोलीस उपनिरीक्षक रंजना बनसोडे यांच्या फिर्यादीवरून डोंबिवली पोलीस ठाण्यात महिला दलाला विरुध्द भा.दं.वि.क. ३७० (२) (३), सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम सन १९५६ चे कलम ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, बळीत महिलांची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे.