मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनावर मात केली आहे. आजच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. 23 ऑक्टोबरला अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करुन घेतले होते. त्यानंतर दोनच दिवसात त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
'राज्यातील कोट्यवधी जनतेच्या सदिच्छा, कार्यकर्त्यांची प्रार्थना तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, सपोर्ट स्टाफच्या प्रयत्नांमुळे मी कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आज घरी परतलो आहे. माझी प्रकृती उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील आणखी काही दिवस घरीच विलगीकरणात राहणार आहे. माझ्या उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या हितचिंतकांचा मी मनापासून आभारी आहे,' अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेचे तसेच त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.
ट्विट करून दिली होती माहिती -
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. 26 ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्र्यांनी स्वत: ट्विट करुन त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. डॉक्टरांच्या सल्ल्याने ते रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र पार्थ पवार यांनी अजित पवार यांना कोरोना झाला नाही असे सुरुवातीला ट्विट करुन सांगितले होते. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता.
आजपासूनच करणार कामाला सुरुवात -
सात दिवसांच्या उपचारानंतर आज उपमुख्यमंत्र्यांना घरी सोडण्यात आले आहे. पुढील काही दिवस ते विलगीकरणात राहणार असून कार्यालयीन कामकाज घरुनच करणार आहेत. महत्वाच्या बैठकांना देखील उपमुख्यमंत्री व्हीसीद्वारे उपस्थित असतील, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे.
खडसेंच्या पक्ष प्रवेशाला हजर नसल्याने आले होते चर्चेत -
काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईमध्ये त्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला अजित पवार गैरहजर होते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्यांना कोरोना झाल्याचे उघड झाल्यानंतर उलट-सुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला होता.
राज्यातील 'या' नेत्यांनी केली आहे कोरोनावर मात -
देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, जितेंद्र आव्हाड, अस्लम शेख, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, अब्दुल सत्तार, सुनील केदार, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, प्राजक्त तनपुरे, बच्चू कडू, मकरंद पाटील, किशोर जोरगेवार, ऋतुराज पाटील, प्रकाश सुर्वे, पंकज भोयर, माणिकराव कोकाटे, मुक्ता टिळक, वैभव नाईक, सुनील टिंगरे, किशोर पाटील, यशवंत माने, मेघना बोर्डीकर, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, चंद्रकांत जाधव, रवी राणा, अतुल बेनके, प्रकाश आवाडे, अभिमन्यू पवार, माधव जळगावकर, कालिदास कोलंबकर, महेश लांडगे, मोहन हंबरडे, अमरनाथ राजूरकर, मंगेश चव्हाण, गीता जैन, सरोज अहिरे, सदाभाऊ खोत, सुजीत सिंग ठाकूर, गिरीश व्यास, नरेंद्र दराडे या नेत्यांना या पूर्वी कोरोना झाला होता. या सर्वांनी कोरोनावर मात केली आहे.