ठाणे - जनतेने महाविकासआघाडीला समाज उपयोगी कामे कारण्यासाठी सत्ता दिली आहे. त्यांनी आकसबुद्धीने काम न करता विधायक कामे करावेत, असा सल्ला भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी सरकारला दिला. ठाणे महानगरपालिकेची अॅक्सिस बँकेतील खाती सरकारी बँकेत ट्रान्सफर करण्याच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली.
2005 पासून अॅक्सिस बँकेत ही खाती आहेत. आजपर्यंत या बाबत कोणत्याही सरकारला आक्षेप नव्हता. आत्ताच्या महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष शिवसेना, त्यावेळी भाजपचे सहकारी होते. तेव्हा त्यांनी मौन पाळले, अशी आठवण पवार यांनी करून दिली.
हेही वाचा - अखेर ठरलं! सोमवारी होणार मंत्रिमंडळाचा प्रलंबित शपथविधी
सेना-भाजप सरकारच्या काळात घेतलेले निर्णय शिवसेना आता रद्द करत आहे किंवा स्थगित करत आहे. शिवसेनेने अचानक आपल्या भूमिकेत बदल का केला, असा प्रश्न त्यांनी केला.
बाळकूम येथील खारफुटीच्या जागेवर उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामांवर झालेल्या कारवाईबाबत देखील त्यांनी आपले मत मांडले. सामान्य नागरिकांना बेघर करण्याआधी ही अनधिकृत बांधकामे होऊ देणाऱ्या पालिका अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यावर कारवाई करावी. ही अनधिकृत बांधकामे होत असताना हे अधिकारी काय झोपले होते का? असा प्रश्न नारायण पवार उपस्थित केला.