ठाणे- वसई-विरार महानगरपालिकेत काम करणाऱ्या एका महिलेला पालिका आयुक्तांनी त्यांच्या घरची धुणी-भांडी आणि इतर काम करायला लावल्याचा आरोप महिलेने केला आहे. मात्र, एक दिवस काम केल्यानंतर महिलेने याबाबतची तक्रार पोलिसात आणि न्यायालयात दिली. योगिता जाधव असे त्या महिलेचे नाव आहे.
योगिता या गेली पाच वर्ष वसई-विरार महानगरपालिकेत काम करतात. वडिलांच्या मृत्यूनंतर योगिता यांना महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून नोकरी मिळाली आहे. योगिता यांच्याकडे परिचारिकेचाही अनुभव आहे. त्यामुळे योगिताची नियुक्ती पालिकेच्या रुग्णालयात टंकलेखक पदावर केली होती. मात्र, आयुक्त गंगाधरण डी यांनी गेल्या महिन्यात योगिता आणि इतर एका महिलेला घरगुती कामासाठी बोलावले. त्यांच्याकडून धुणी-भांडी, मासे साफ करणे, शौचालय साफ करणे, कपडे धुणे, जेवण बनवणे असे काम करुन घेतले असल्याचा योगिताचा यांचा आरोप आहे. याबाबत योगिता यांनी न्यायालयात तक्रार केली आहे.
मात्र या प्रकारानंतर आयुक्तांनी तिच्यावर राग ठेवून तिची नियुक्ती एका कोविड रुग्णालयात रुग्णांचे कपडे धुण्यास केली, असे योगिता यांनी सांगितले. योगिता यांनी काही दिवस सुट्टी घेतली असता, त्यांना बडतर्फ करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत.
याबाबतची तक्रार योगिता यांनी ठाणे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडे केली. अविनाश जाधव यांनी महानगर पालिका आयुक्तांना तत्काळ निलंबित करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन केले, जाईल असे सांगितले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनसेचे नेते आणि आयुक्त यांच्यात भेटण्यासाठी वेळ न दिल्याने वाद झाला होता. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. या प्रकारानंतर मनसेचे अनधिकृत कार्यालय तोडण्यात आले होते. तेव्हा पासून मनसे आणि पालिका यांच्यात हा वाद निर्माण झाला आहे.