ठाणे - सर्वोच्च न्यायालयाने देशभरात रेड्यांच्या झुंजीवर निर्बंध घातलेले आहेत. मात्र, असे असताना देखील स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट रोजी भिवंडी तालुक्यातील सुपेगाव येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या मोकळ्या मैदानात बेकायदेशीरपणे दहा हजार रुपयांच्या पैजेवर रेड्याची झुंज खेळवण्यात आली. या मुक्या प्राण्यांच्या झुंजी विरोधात प्राणीमित्रांनी संताप व्यक्त करुन रेडा मालक व आयोजकांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. गणेशपुरी पोलिसांनी शनिवारी रात्री उशिराने चार जणांवर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.
केशव उर्फ पिंट्या बुधाजी शेळके (रा.साकरोली) संतोष काशिनाथ भोईर (रा.अनगाव) राकेश कांतीलाल शेलार (रा. खालींग) व संदीप महादू भोईर (रा.साकरोली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आयोजकांची नावे आहेत. गुन्हा दाखल झालेल्या चारही आरोपींनी आपसात संगनमत करुन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शालेय मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना रेड्यांच्या झुंजी लावली होती. सुदैवाने यात रेडे सैरभैर होऊन अपघात घडला नाही, या झुंजी प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आयोजकांना लवकरच अटक केली जाईल,अशी माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विशाल वायकर यांनी दिली आहे.