ठाणे - जिल्ह्यातील वाघबीळ गावच्या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे ठरवले असून गावामध्ये प्रचारफेरी नाही तर पोलिंग बूथही लावू न देण्याचा इशारा दिला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार भूमीपुत्रांवर आलेल्या संकटाच्या वेळी ५ वर्ष गावात फिरकले नाहीत. यामुळेच ग्रामस्थांनी एकमताने मतदानावर बहिष्कार घालण्याचे ठरवले आहे.
गावामध्ये क्लस्टर योजना, वॉटर डिसेलिनेशनचे आरक्षण, वॉटर फ्रंट प्रकल्प, मेट्रो कारशेडचे आरक्षण, मेट्रो कास्टींग यार्डचे आरक्षण, कांदळवनाची शेतीमध्ये लागवड, जबरदस्तीने होणारे अधिग्रहण, मोबदला न देता सुरू असलेले अधिग्रहण, भूमिपुत्रांच्या घरांवर कारवाई अशाप्रकारची अनेक संकटे आली होती.
त्यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून खासदारांनी लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी भूमिपुत्रांशी संवाद साधणे अपेक्षित होते. परंतु, दुर्दैवाने तसे झाले नाही. त्याचप्रमाणे नवी मुंबईतील ग्रामस्थ अनेक वर्षे प्रॉपर्टी कार्ड मिळावे म्हणून लढा देत आहेत. परंतु, म्हणावा तसा प्रतिसाद लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून मिळाला नाही.
नवी मुंबईतील जमिनी १९७०च्या आसपास अधिग्रहीत केल्या गेल्या. त्यानंतर शेतकरी आपले अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहेत. ठाण्याचा विकास होत असल्याचे चित्र दिसत असले तरी गावांना संपवण्याचा विडा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी उचलला आहे. वाघबीळ गावामधून प्रचारफेरी नव्हे तर पोलिंग बूथसुध्दा लावू दिला जाणार नाही, अशी भूमिका वाघबीळच्या गावक-यांनी घेतली आहे.