ठाणे - महिलांना सुलभरित्या कोरोना प्रतिबंधक लस घेता यावी, यासाठी महापालिकेच्यावतीने टेंभी नाका येथे महिलांसाठी विशेष लसीकरण केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. अनेक महिला या नोकरीनिमित्ताने तसेच मोलमजूरीच्या कामानिमित्त दिवसभर घराबाहेर असतात. त्यामुळे या महिलांना लसीकरण केंद्रावर वेळेत पोहचणे कठीण होते. परिणामी आजवर ठाणे शहरात झालेल्या एकूण लसीकरणाच्या आकडेवारीत महिलांची आकडेवारी कमी आहे. महिलांना त्यांच्या वेळेनुसार लस घेता यावी यासाठी ठाण्यातील टेंभीनाका येथील शाळा क्र. 12मध्ये दिवसभर दोन सत्रात सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत स्वतंत्र महिलांसाठी लसीकरण केंद्र आजपासून सुरू करण्यात आले.
ज्या प्रमाणात लस महापालिकेकडे उपलब्ध होेईल, त्याप्रमाणात इतर ठिकाणीसुद्धा दोन सत्रात लसीकरण केंद्र सुरू करण्याचा मानस असल्याचेही महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच गर्भवती महिलांचेही लसीकरण प्राधान्याने होण्याच्या दृष्टीने लसीकरण केंद्रावर त्यांना प्रथम प्राधान्य देऊन लस दिली जात आहे. तरी गर्भवती महिलांनीही आपले लसीकरण करुन घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. आज लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी लसीकरणासाठी महिलांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला.
ठाणे जिल्ह्यात २९ हजार नागरिकांचे लसीकरण -
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्यात आज २९ हजार ९१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५९ लाख ८४ हजार ३२६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यापैकी ४१ लाख ९५ हजार ८४७ नागरिकांना पहिल्या डोसचे तर १७ लाख ८८ हजार ४७९ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. आज दिवसभरात लसीकरणाचे सुमारे १६७ सत्र आयोजित करण्यात आले.
![citizens for vaccination](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/attachedvideopics_20092021193958_2009f_1632146998_120.jpg)
पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित विशेष लसीकरण शिबिर -
संपूर्ण देशात लसीकरण मोहिम सुरू आहे. जसजसा लसींचा साठा उपलब्ध होतो, त्याप्रमाणे योग्य असे नियोजन करुन महापालिका कार्यक्षेत्रात लसीकरण केले जाते. आजवर लसीकरणाचा 11 लाख 50 हजारांचा टप्पा ठाणे महापालिकेने पूर्ण केलेला आहे. आजच्या दिवशी ठाणे महापालिका क्षेत्रात महापालिकेने 19 हजार विक्रमी लसीकरण केले आहे. आजचे संपूर्ण लसीकरण हे आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी भेट म्हणून समर्पित करीत आहोत असे महापौरांनी नमूद केले होते.