ठाणे - शहरात अज्ञात समाजकंटकाने तब्बल ११ लाखांच्या फिरत्या शौचालयाला आग लावल्याची घटना घडली. या आगीत हे शौचालय संपूर्ण जळून खाक झाले आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला.
मोहने गावातील एन.आर.सी कंपनीच्या शेजारी असलेल्या फुले नगरमधील रहिवाशांसाठी कल्याण डोंबिवली महापलिकेच्यावतीने फिरत्या शौचालयाची सुविधा देण्यात आली. हे फिरते शौचालय आर.एस बस थांबा जवळ ठेवण्यात आले होते. मात्र, त्याला अज्ञातांनी आग लावल्याची घटना घडली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात पालिका प्रशासनाकडून शहर हागणदारीमुक्त व उघड्यावर नागरिकांनी शौच करायला नको, म्हणून पालिका प्रशासनाकडून शहरातील विविध भागात फिरते शौचालयांच्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. पालिका प्रशासनाकडे १५ फिरते शौचालय असून त्यापैकी ५ ते ६ फिरते शौचालय नादुरुस्त होवून बंद अवस्थेत आहे. या फिरत्या शौचालयाची देखभाल व दुरूस्ती पालिका प्रशासनाच्या घनकचरा विभागामार्फत करण्यात येते. या विभागाकडून नगरसेवक व नागरिकांच्या मागणीनुसार फिरते शौचालयाची सुविधा पुरविण्यात येते.
मोहाने येथील एन.आर.सी कंपनीच्या शेजारी असलेल्या फुलेनगर मधील रहिवाशांनीही एका फिरते शौचालयाची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार तब्बल ११ लाखांचे फिरते शौचालय आर.एस बस थांबानजीक नागरिकांना शौचसाठी उभे करून ठेवण्यात आले होते. मात्र, २५ एप्रिलला दुपारच्या सुमाराला कोणीतरी अज्ञात समाजकंटकाने फिरत्या शौचालयालाच आगीच्या हवाली केले. ही आग एवढी भयंकर होती की, यामध्ये संपूर्ण शौचालय जळून खाक झाले. एका नागरिकाने कल्याण अग्निशमन दलाच्या कार्यलयात संपर्क करून घटनेची माहिती दिली. त्यावेळी घटनास्थळी अग्निशमन दलाची १ गाडी दाखल झाली. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत संपूर्ण शौचालय जळून खाक झाल होते.
फुलेनगर मध्ये ५ ते ७ हजार लोकवस्ती आहे. काही रहिवाशांनी हागणदारीमुक्त योजनेत शौचालय उभारली. मात्र, आजही शेकडो रहिवाशांना नैसर्गिकविधीसाठी याच फिरत्या शौचालयाचा आसरा होता. त्यामुळे गेल्या ५ ते ६ दिवसापासून रहिवाशांना उघड्यावरच नैसर्गिकविधी उरकावा लागत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. तर घनकचरा व्यवस्थापन, कल्याण विभागाचे अधिकारी जोशी यांच्याशी संपर्क साधला असता. पोलीस व पालिका दोन्हीकडील अधिकारी, कर्मचारी लोकसभा निवडणुकीत व्यस्त असल्याने गुन्हा दाखल करण्यास उशीर लागल्याचे त्यांनी सांगितले.