ठाणे : घशात मासा अडकल्याने अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना अंबरनाथच्या उलन चाळ परिसरात एका घरात घडली आहे. शहबाज सरफराज अन्सारी (Shahbaz Sarfaraz Ansari) (वय, ६ महिने) असे मृत झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे.
आईवडिलांना धक्काच बसला: मिळालेल्या माहितीनुसार, मृतक शहबाज हा कुटूंबासह अंबरनाथ मधील उलन चाळीत राहत होता. गुरुवारी रात्रीच्या सुमारास शहबाज हा घराबाहेर इतर लहान मुलांसह अंगणात खेळत असताना तो अचानक तडफडू लागल्याने त्याच्या सोबत खेळत असलेली मुले घाबरली होती. त्यानंतर मुलांनीच चिमुरड्या शहबाजच्या आईवडिलांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच तत्काळ आई वडिलांनी शहबाजकडे धाव घेतली. तर तो तडफड असल्याचे पाहून आईवडिलांना धक्काच बसला. आणि नेमके काय झाले आहे, हे त्यांनाही कळत नव्हते.
शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेले: काही वेळाने शहबाजच्या आईवडिलांनी त्याला घेऊन अंबरनाथ मधील एका खाजगी रुग्णालयात गेले. मात्र येथील रुग्णालयात शहाबाजला नेमके काय झाले आहे? याचे निदान होऊ शकले नाही. त्यामुळे त्याला घेऊन आईवडिलांनी उल्हासनगरमधील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत फार उशीर झाल्याने शासकीय रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच शहबाजचा रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला.
मृत्यूचे नेमके कारण: दरम्यान, शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी शहबाज याची तपासणी केली असता त्याच्या घशात मासा अडकल्याचे निर्दशनास आले. त्यामुळे त्याचा श्वास रोखला जाऊन त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. घश्यात अडकलेला मासा डॉक्टरांनी त्याच्या घशातून बाहेर काढला. तर आज सकाळच्या सुमारास चिमुरड्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून त्याच्या मृत्यूचे नेमके कारण शोधून काढले जाणार असल्याची माहिती शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश म्हस्के यांनी दिली आहे.