उल्हासनगर (ठाणे ) - उल्हासनगरातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. हा पोलीस कर्मचारी मुंबईतील येलोगेट ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली आहे.
मुंबईतील येलोगेट ठाण्यात कार्यरत असणारा व कॅम्प नंबर 4 मधील जिजामाता कॉलनी, संभाजी चौक परिसरात राहणारा पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्याला कोविड-19 रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसाची पत्नी, मुलगा व मुलीस क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण परिसर सील केला आहे. उल्हासनगरात दाखल करण्यात आलेला हा शहरातील पहिलाच रुग्ण असल्याचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले.
यापूर्वी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दुबईवरून आलेली महिला कस्तुरबा रुग्णालयात पॉझिटिव्ह ठरली होती. तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मुंबईतील खार रुग्णालयात काम करणारा व शहरातील कॅम्प नंबर 5 मध्ये राहणारा कर्मचारी मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह ठरला आहे. तिथे त्याच्यावर उपचार सुरू असून त्याच्या परिवारासोबत सुमारे 30 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. आयुक्तांनी घेतला बेशिस्त नागरिकांचा समाचार घेतला.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ही शहराची चिंता वाढवणारी बाब आहे. अत्यंत गर्दीच्या ठिकाणी गर्दी करण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी शिक्षा करूनही शिस्त मोडणाऱ्यांमुळे त्यांच्यासोबत परिवार व नागरिक संकटात येण्याची शक्यता वाढली आहे. कोरोनाने आक्राळ-विक्राळ रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरात साथ रोगमुक्त ठेवणे हे प्रशासनाच्या हातात राहिले नसून शिस्त पाळणाऱ्या नागरिकांच्या हातात आहे. दरम्यान 28 ते 30 एप्रिल असे तीन दिवस संपूर्ण शहरातील भाजीपाला, फळ विक्रेते यांची दुकाने हातगाड्या पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश देशमुख यांनी जाहीर केला आहे.
कोव्हिड-19 मध्ये चार रुग्ण -
उल्हासनगरच्या शासकीय महिला प्रसूतिगृहाचे कोविड-19 मध्ये रूपांतर करण्यात आलेल्या रुग्णालयात कल्याण-1, बदलापूर-2 आणि आता उल्हासनगर-1 असे चार कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. भावना तेलंग यांनी दिली.