ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या दोन स्थायी समिती सदस्यांनाच कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने महापालिकेत खळबळ उडाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेले हे सदस्य स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित होते. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य दोन स्थायी समिती सदस्यांना ही 14 दिवस विलगीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. मागील काही दिवसांत सातत्याने दररोज अडीचशे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. आजपर्यंत कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 3 हजार 700च्या घरात गेली आहे. ठाण्यातील एका नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आता हेच लोण कल्याण-डोंबिवली शहरातही पसरू लागले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका स्थायी समितीमध्ये सर्वपक्षीय 16 सदस्य आहेत. 17 जून रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हे दोन्ही नगरसेवक उपस्थित होते.
महापालिका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थायी समिती सभागृहाचे प्रत्येक बैठकीपूर्वी व बैठकीनंतर असे दोन वेळा निर्जंतुकीकरण करण्यात येते. तसेच संपूर्ण इमारतीचेही दररोज निर्जंतुकीकरण करण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य तसेच अधिकारी व कर्मचारी वर्गामध्ये कमीतकमी सहा फुटांचे अंतर ठेवण्यात येते, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. त्यामुळे बैठकीला हे दोन्ही सदस्य उपस्थित राहिले असले तरी त्यामुळे इतर सर्व सदस्यांना तसेच बैठकीला उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना 14 दिवसांचे विलगीकरण करण्याऐवजी त्या दोन सदस्यांच्या आजुबाजूला असलेल्या अन्य दोन स्थायी समिती सदस्यांना 14 दिवसांसाठी गृह विलगीकरण करण्याच्या सूचना पालिकेने दिले आहेत.
हेही वाचा - कल्याण-डोंबिवलीत चौथ्या दिवशी कोरोनाबाधितांचा आकडा तब्बल 254च्या घरात