ठाणे - शासनाची परवानगी न घेता 29 हजांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरला अखेर अटक करण्यात आली आहे. उमाशंकर गुप्ता असे या डॉक्टरचे नाव आहे. त्याला बदलापूर कुळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
डॉक्टर गुप्ता याचे वांगणी पश्चिम परिसरात शिल्पा क्लिनिक या नावाने अन्सारी चाळीत दहा बाय वीसच्या पत्र्याच्या खोलीत क्लिनिक आहे. याच क्लिनिकमध्ये कोरोना रुग्णांवर आरोपी डॉक्टर उपचार करत होता. विशेष म्हणजे माझ्या औषधाने गंभीर कोरोना रुग्ण एका दिवसात बरा होतो असा दावा देखील हा डॉक्टर करायचा. त्याने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हयरल केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने गंभीर कोरोना रुग्णाला बर केल्याचा दावा केला होता. या व्हिडिओच्या आधारेच अंबरनाथ तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी डॉक्टर गुप्तासह त्याच्या साथीदार महिला डॉक्टरवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. मात्र गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच डॉक्टर गुप्ता हा क्लिनिक बंद करून फरार झाला होता.
आरोपीला न्यायालयीन कोठडी
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी डॉक्टर गुप्तासह त्याची साथीदार असलेल्या त्या महिला डॉक्टरचा शोध सुरू केला होता.
अखेर आज सकाळच्या सुमारास डॉक्टर गुप्ता याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्याला आज दुपारच्या सुमारास उल्हासनगरमधील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने डॉक्टर गुप्ताला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान हा डॉक्टर कोरोनाबाधितांना नेमके कोणते औषध देत होता, कशा पद्धतीने उपचार करत होता याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा - गरीब मराठा विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी फेर याचिका न्यायालयात दाखल करू - मंत्री विजय वडेट्टीवार