नवी मुंबई - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. नवी मुंबईतही दिवसागणिक कोरोनाचा कहर वाढतंच आहे. काल (रविवार) 22 रुग्ण आढळल्याची घटना ताजी असतानाच, आज पुन्हा 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सद्यस्थितीत नवी मुंबईत 145 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत.
नवी मुंबईत आतापर्यंत 2 हजार 123 व्यक्तींची कोविड 19 ची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 1 हजार 485 व्यक्तीते अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 491 व्यक्तींचे अहवाल येणे प्रलंबित आहे.आत्तापर्यंत नवी मुंबईत 156 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये 11 रुग्ण इतर ठिकाणचे असून 145 हे नवी मुंबई शहरातील आहेत.
आज नवी मुंबईत 174 व्यक्तींच्या कोविड 19च्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये 160 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, 14 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये बेलापूरमधील 4 जण, नेरुळमधील 3 जण, दिघ्यातील 2 जण, घणसोलीमधील 2 जण व कोपरखैरणेमधील 3 जण असे 14 रुग्ण आढळून आले आहेत.
काल नेरुळमध्ये एका कुटुंबातील 9 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्याच कुटुंबातील निकटवर्तीय आणखी 4 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. एकाच कुटुंबातील 13 जणांना कोरोनाची लागण झाल्याने घरात सोशल डिस्टनसिंग पाळण्याचे पालिकेने आवाहन केले आहे. आत्तापर्यंत नवी मुंबईत 27 जण कोरोनामुक्त झाले असून, 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.