ठाणे: पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास फुरकान हुल्लेक हा तरुण कल्याण पश्चिम भागातील बैलबाजार परिसरात उभा होता. यावेळी आरोपी फैज कर्ते हा त्या ठिकाणी आला. यावेळी 'का बघतोय?' असे विचारत फैजने फुरकानशी वाद घालण्यास सुरुवात केली. तेव्हा सरवर हुल्लेक त्याने मध्यस्थी करत वाद मिटविला. मात्र काही वेळानंतर फुरकानने पुन्हा तेथे येऊन तू मध्यस्थी का केली ? असा जाब विचारत हुज्जत घातली. यानंतर फैजने सरवरला हॉकी स्टिकने मारहाण करण्यास सुरुवात केली आणि धारदार चाकू काढत सरवर याच्यावर हल्ला केला.
हल्ला करून आरोपी पसार: हल्ल्यानंतर फैज पसार झाला. त्यानंतर काही नागरिकांनी सरवरला गंभीर जखमी अवस्थेत कल्याणच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात फैज आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. सध्या पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
मित्र-मैत्रिणीवर चाकूहल्ला: कल्याणच्या पूर्वेकडील रेल्वे वसाहतीजवळ एका अनोळखी इसमाने एक तरुण आणि त्याच्या मैत्रिणीवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले आहेत. या संदर्भात जखमींनी दिलेला तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी अनोळखी हल्लेखोराविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.
माथेफिरूविरुद्ध गुन्हा दाखल: पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील चिंचपाडा भागात राहणारा मयूर राजू नाईक (27) हा तरुण रात्री सव्वाअकरा वाजता त्याच्या मैत्रिणीसह कल्याण पूर्व रेल्वे स्थानक भागात उभा होता. दरम्यान अनोळखी व्यक्तीने त्यांना तुम्ही येथे का थांबले ? येथून निघून जा, असे दरडावले. यानंतर त्या व्यक्तीने मयूरला मारहाण आणि शिवीगाळ करत त्याच्यावर चाकूहल्ला केला. वादात मयूरच्या मैत्रिणीने मध्यस्थी केल्याने हल्लेखोराने तिच्यावरही चाकूने हल्ला चढविला. यानंतर त्या अनोळखी व्यक्तीने तेथून पळ काढला. जखमी अवस्थेत मयूरने कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला प्रसंग कथन केला. या संदर्भात पोलिसांनी मयूरच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून त्या माथेफिरूचा शोध सुरू केला आहे.
हेही वाचा: Karnataka Election Campaign : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारातून काढता पाय