ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्यावतीने सामाजिक भान ठेवून पर्यावरणपूरक पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला ठाणेकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यंदा ठाणेकरांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यावर भर दिला.
पालिका प्रशासनाने ध्वनिप्रदूषणविरहित, फटाकेमुक्त आणि पर्यावरणपूरक पद्धतीने दिवाळी साजरी करण्यासाठी केलेल्या आवाहनाला ठाणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्यावतीने दिवाळीपूर्व व दिवाळी कालावधीत हवेची गुणवत्ता तपासण्यात आली. त्यानुसार ७ नोव्हेंबर रोजी दिवाळीपूर्व कालावधीत २४ तासांकरिता हवेतील धुलिकणांचे प्रमाण १२६ मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर इतके होते. नायट्रोजन ॲाक्सिजनचे प्रमाण ३४ मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर तर, सल्फरडाय ॲाक्साईडचे प्रमाण २४ मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर इतके आढळले होते. त्याचप्रमाणे ध्वनीची अधिकतम तीव्रता ६९ डेसिबल इतकी नोंदविण्यात आली होती.
दिवाळीविषयक मार्गदर्शक सूचनांचे तंतोतन पालन-
तसेच १४ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी २४ तासांकरिता हवेतील धुलिकणांचे प्रमाण १३३ मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर इतके होते व नायट्रोजन ॲाक्साईडचे प्रमाण ३७ मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर तर सल्फरडाय ॲाक्साईडचे प्रमाण २९ मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर इतके आढळले आहे. तर ध्वनीची अधिकतम तीव्रता ७२ डेसिबल इतकी नोंदविण्यात आली.
कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी राज्य शासनाचे दिलेले निर्देश व राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार, ठाणे महानगरपालिकेद्वारे महापालिका क्षेत्राकरिता दिवाळीविषयक मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. या सूचनांचे ठाणेकर नागरिकांनी तंतोतंत पालन केले आहे. त्यामुळे दिवाळी कालावधीत मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा हवा प्रदूषणात आणि ध्वनी प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे.
धूलिकणही झाले कमी-
सन २०१८ व २०१९ च्या तुलनेत यंदा दिवाळीच्या दरम्यान हवेतील धुलीकणांचे प्रमाण ४४ टक्क्यांपर्यंत कमी आढळले आहे. तर ध्वनी पातळीत २१ ते २९ टक्क्यांपर्यंत घट झालेली आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक देखील सुधारला असून त्यात ३७ पर्यंत सुधारणा झालेली आहे.
ध्वनी प्रदूषण ही झाले कमी-
दिवाळी कालावधीत गतवर्षीच्या तुलनेत ध्वनी पातळीत मोठ्या प्रमाणात घट दिसून येते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी ६ ते रात्री १० या कालावधीत ध्वनी तीव्रता अधिकतम म्हणजेच ७२ डेसिबल आणि ६१ डेसिबल इतकी आढळली आहे.
तसेच ध्वनीची अधिकतम तीव्रता 72 डेसिबल इतकी नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळी कालावधीत मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा हवा प्रदूषणात आणि ध्वनी प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे, असे दिसून आले आहे.
हेही वाचा- जालन्यातील सीताफळांना दिल्लीत मिळतोय चौपट भाव; "विकले ते पिकेल" धोरणाचा झाला फायदा
हेही वाचा- लग्नावरुन परतणाऱ्या १४ वऱ्हाडींवर काळाचा घाला; उत्तर प्रदेशच्या प्रतापगढमधील घटना