ठाणे - भाजप सरकार हे ईडीचा वापर करून शरद पवारांचे राजकीय अस्तित्व संपविण्याचे षडयंत्र रचत आहे. तसे झाले तर संबंध महाराष्ट्र पेटून उठेल, असा धमकीवजा इशारा देत बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ठाण्यात आंदोलन करण्यात आले.
हे ही वाचा - पवारांच्या अंगावर हात टाकून भाजपने 'वाघाला' डिवचले, जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया
25000 कोटींच्या महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणाबाजी करत आंदोलकांनी भाजप आणि ईडीचे पुतळे देखील जाळले.
ठाणे पाचपाखाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर केलेल्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि नेते सामील झाले होते. शरद पवार साहेब हे आमचे दैवत आणि श्रद्धास्थान आहेत. सरकारने त्यांच्या केसाला जरी धक्का लावला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल आणि जे काही घडेल त्याला संपूर्णतः राज्य सरकार जबाबदार असेल, असे आनंद परांजपे म्हणाले.
हे ही वाचा - शरद पवार यांच्यावरील कारवाईचा औरंगाबाद राष्ट्रवादीकडून निषेध