ठाणे : राज्यात डान्स बारवर बंदी असतानाही या नियमाचे ठाणे जिल्ह्यात सर्रास उल्लंघन होत असल्याचे ठाणे जिल्ह्यात पुन्हा दिसून आले आहे. पोलिसांनी सपना बारवर छापा टाकला असता, या ठिकाणी तोकड्या कपड्यांवर बारबाला ग्राहकांसोबत अश्लील कृत्य करताना आढळून आले. पोलिसांनी बार मालक विशंभर सुखटे, दोन व्यवस्थापक, २१ बारबाला आणि १० ग्राहकांसह ३४ जणांना बारमधून ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस ठाण्यात आणून पोलिसांनी १० ग्राहकांसह ३४ जणांना सीआरपीसी ४१(१)(अ) अन्वये नोटीस देऊन जमिनीवर सुटका केली आहे.
नारपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी सांगितले की, भिवंडी तालुक्यात गोदाम पट्टा असलेल्या राहनाळ परिसरातील कांचन कंपाऊंडमध्ये असलेल्या सपना बार अँड रेस्टॉरंट नावाने बार आहे. या बारमधील बारबालांकडून नियम व कायदे धाब्यावर बसविण्यात आले आहेत. तिथे अश्लील चाळे केले जात असून बार उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती नारपोली पोलिसांना मिळाली होती.
भिवंडीत सुमारे २३ बार असतात सुरू- विशेष म्हणजे याच सपना बारमध्ये दोन महिन्यांपूर्वी याच कारणास्तव पोलिसांकडून छापा टाकण्यात आला होता. तरीही या बारमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे शहर व परिसरात सुरू असलेल्या सर्वच ऑर्केस्ट्रा बारमध्ये पोलिसांच्या आशीर्वादाने हा अश्लील प्रकार खुलेआम सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. भिवंडी महापालिका हद्दीसह ग्रामीण भागातील मुंबई–नाशिक महामार्गावर व गोदाम पट्यात सुमारे २३ च्या जवळपास बार सुरू असतात. त्यामध्ये लैला, देवदास, पारो, किनारा, सिंगर, लवली, बॉम्बे पेलेस, नाईट लव्हर्स, सपना, अप्सरा, ड्रीम लव्हर्स, सम्राट, सुकुर, शिल्पा, सिल्वर पेलेस, इन्जोय, डब्लूडब्लूएफ, आशीर्वाद, सिरोज, संगीत आदी ऑर्केस्टा- डान्स बारचा समावेश आहे. ऑर्केस्टाची परवानगी असताना डान्स बार सुरू करण्यावर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांमधून मागणी करण्यात येत आहे.
पैशांची उधळण सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल- काही महिन्यापूर्वी भिवंडीतील एका डान्स बारमधील बारबालावर पैशांची उधळण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर उशिरापर्यत सुरु असलेल्या ऑर्केस्टा बारवर पोलीस प्रशासनाची करडी नजर आहे. तरी देखील पुन्हा उशिरापर्यत ऑर्केस्टा बार सुरू राहत असल्याचे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या छापेमारीतून समोर आले आहे. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामुळे अन्य बारचालकांचे धाबे दणाणले आहेत.