ठाणे - मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. शिकवणीवरून येणाऱ्या मुलीचा खून करण्यात आला आहे. तिसगावमधील दुर्गा दर्शन सोसायटीच्या आवारात हा प्रकार घडला हल्लेखोर तरुणाला परिसरातील नागरिकांनी पकडून कोळसेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. आदित्य कांबळे (२०) असे हल्लेखोर तरुणाचे नाव आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
पोलीस सुत्रांनी सांगितले, संध्याकाळी सात वाजल्यापासून आरोपी आदित्य दुर्गा दर्शन सोसायटीच्या आवारात येऊन रहिवाशांना संबंधित मुलगी घरी किती वाजता येते याची माहिती घेत होता. रहिवाशांना तो कशासाठी माहिती घेतो, याची जाणीव झाली नाही. आदित्य हा पीडिता राहत असलेल्या सोसायटी परिसरात दबा धरुन बसला होता.
पळून जात असताना आरोपीला अटक- मुलगी बुधवारी रात्री आठ वाजता आपल्या आईसोबत खासगी शिकवणी वर्गावरुन घरी येत होती. सोसायटीतील जिन्यातून घरात जात असताना आदित्यने पाठीमागून येऊन मुलीच्या आईला ढकलून देऊन मुलीवर चाकुने आठ वार केले. तिच्या आईने मुलाला विरोध करण्याचा प्रयत्न केला. बेभान झालेल्या आदित्यने आईला दाद दिली नाही. छातीवर जिव्हारी घाव झाल्याने मुलगी जिन्यात कोसळली. आईने ओरडा करताच सोसायटीतील रहिवासी, पादचारी घटनास्थळी धाऊन आले. आदित्य तेथून पळून जात होता. रहिवाशांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपी हा तिसगावमधील रहिवाशी आहे. या घटनेची माहिती मिळताच साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख घटनास्थळी दाखल झाले.
एकतर्फी प्रेमाचा संशय- गंभीर जखमी मुलीला तात्काळ लगतच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरू करताच तिचा मृत्यू झाला असल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. मिळालेली माहिती अशी की, या मुलीला आरोपी आदित्यने दोन वेळा प्रेमासाठी गळ घातली होती. मुलीने त्यास नकार दिला होता. तो राग त्याच्या मनात होता. त्या रागातून त्याने हे कृत्य केले असल्याचे समजते. कल्याण पूर्व भागात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
हेही वाचा-
- 307 चा बदला 302 ने; पूर्ववैमनस्यातून तरुणावर तलवारीने सपासप वार, स्वातंत्र्य दिनी गुंडांची दहशत
- Sana Khan Murder : भाजप नेत्या सना खान यांची हत्या; एकाला अटक, जबलपूरमध्ये मृतदेहाचा शोध सुरू
- Nanded Honour Killing : आत्महत्या केल्याचा बनाव रचत मुलीचा जन्मदात्याकडून खून, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर