ठाणे - चोरलेल्या दुचाक्या आणि रिक्षांची बनावट कागदपत्रे तयार करून त्याद्वारे ओएलएक्स ( OLX ) ॲपवर विक्री करणाऱ्या सख्या दोन भावांचा कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी पर्दाफाश केला ( two wheelers selling on olx ) आहे. या दोघांकडून आतापर्यंत एकूण १४ गुन्हे उघडकीस आले आहेत. मोहंमद अकबर अब्दुल अजीज शेख (वय २७) आणि अबुबकर उर्फ जुनेद उर्फ जाफर अब्दुल अजीज शेख (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा बदमाश भावांची नावे आहेत. कल्याण जवळच्या आडीवली गावात असलेल्या राम रेसीडन्सीत राहणारे आहे.
बुलेट विक्री करताना पोलिसांच्या सापळ्यात अडकला - कल्याण पूर्वेकडील संतोषनगरमध्ये राहणारे सुजित घाडगे यांनी त्यांची दुचाकी सर्वोदय मॉलसमोर पार्क केली होती. चोरट्याने ही दुचाकी काही दिवापूर्वी लांबवली. या संदर्भात तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपास करून दुचाक्या लांबविणारा एकजण बैलबाजार येथे बुलेट विकण्यासाठी येणार असल्याची माहिती काढली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्यासह पोनि प्रदिप पाटील, सपोनि देविदास ढोले, सपोनि दिपक सरोदे, फौजदार संजय जगताप यांनी तेथे जाऊन सापळा रचला. मोहमद अकबर अब्दुल अजीज शेख याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडील बुलेट डायघर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे व सदर बुलेटची बनावट कागदपत्रे तयार करुन ही कागदपत्रे, तसेच बुलेटचे फोटो ओएलएक्स ॲपवर डाऊनलोड करुन विक्री करणार असल्याची माहिती दिली.
चोरीच्या दुचाकीचे फोटो ओएलएक्स ॲपवर अपलोड करून विक्री - आरोपी मोहमद शेख याने चौकशीदरम्यान त्याचा साथीदार सख्खा भाऊ नामे अबुबकर उर्फ जुनेद शेख याचाही समावेश असल्याची माहिती कळताच पोलिसांनी त्यालाही कल्याण पूर्वेतुन अटक केली. दुचाकीची चोरी केल्यानंतर तिचे फोटो ओएलएक्स ॲपवर टाकले जायचे. अशी दुचाकी विकत घेणाऱ्या व्यक्तीबरोबर दुचाकीच्या किंमतीचा व्यवहार करुन त्यांना सदर दुचाकीचे आरसी बुक, स्वतःच्या नावाचे बनावट आधारकार्ड देऊन विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
४ लाख ४८ हजार रूपये किंमतीची ११ वाहने हस्तगत - यातील मोहमद शेख हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुध्द यापूर्वी दुचाकी चोरीचे २, गुन्हे दाखल आहेत. भावांच्या जोडगोळीकडून महात्मा फुले चौक, कोळसेवाडी, अंबरनाथ, शिवाजीनगर, शिळ-डायघर पोलिस ठाण्यांतून दाखल असलेल्या १४ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. या दुकलीकडून आतापर्यंत २ बुलेट, १ अॅव्हेन्जर, १ यूनिकॉर्न, १ डीओ, १ रिक्षा, ५ पल्सर अशी ४ लाख ४८ हजार रूपये किंमतीची एकूण ११ वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.