ठाणे : सोसायटीच्या रहिवाशांनी पाळलेल्या एका श्वानला भरधाव कार चालकाने चिरडून ठार केल्याची घटना घडली आहे. ही घटना गोदरेज हिल भागातील हायप्रोफाईल असलेल्या रोजाली कॉम्प्लेक्सच्या मेन गेट जवळ घडली आहे. शिवाय ही घटना सीसीटीव्हीत कैद असून याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात कार चालका विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सुहास रेड्डी (वय ३५, रा. रोजाली कॉम्प्लेक्स , गोदरेज हिल,कल्याण ) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. तर 'ब्रूजो' असे कार अपघात जागीच ठार झालेल्या श्वानचे नाव होते.
उपचारादरम्यान श्वानाचा मृत्यू : मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सुहास रेड्डी हे कल्याण पश्चिम भागात असलेल्या गोदरेज हिल परिसरातील रोजाली कॉम्प्लेक्समध्ये कुटूंबासह राहतात. त्यातच २९ मार्च रोजी सकाळच्या सुमारास सुहास यांच्या मामाला हृद्यविकाराचा झटका आल्याने सुहास यांनी कार मधून घेऊन जात नजीकच्या रुग्णालयात मामाला उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सुहास हे पुन्हा सकाळी साडेसातला आपल्या घरी कारने विरुद्ध दिशेने येत असतानाच, त्यांच्या कारखाली श्वान आल्याने त्याचा चिरडून मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून कल्याण पश्चिम भागातील साई चौकातील साई गौरव इमारतीत रहाणारे चंदन लालचंद शेदारपुरी (वय ४५) यांच्या तक्रारीवरून कार चालक सुहास यांच्यावर भादंवि कलम ४२९, सह प्राण्यांचा छळ प्रतिबंधक १९६० चे कलम ११ (१) (अ ) प्रमाणे गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार एन. चोरमले करीत आहेत.
'ब्रूजो'वर रहिवाशांनी केले अंतिमसंस्कार : दरम्यान, रोजाली कॉम्प्लेक्स मधील रहिवाशांनी मृतक श्वानाला लहानपणा पासून त्याची देखभाल करत त्याचे नाव 'ब्रूजो' ठेवले होते. काही दिवसात रहिवाशांना 'ब्रूजो'चा लढा लागला होता. त्यामुळे सोसायटीतील सर्व रहिवाशांनी त्याच्या निधनावर हळहळ व्यक्त केली. शिवाय त्यांच्या अपघाती निधनानंतर सोसायटीच्या रहिवाशांनी विधी करून 'ब्रूजो'वर अंतिमसंस्कार केले.
हेही वाचा - Mumbai Ram Navami Clashes : मालाड परिसरात रामनवमी शोभायात्रेदरम्यान हाणामारी; २० जणांना अटक, ३०० हून अधिक जणांविरूद्ध गुन्हा