ठाणे - शहरातील एका ६ महिन्याच्या मुलाने कोरोनावर मात केली आहे. रविवारी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयातून त्याला डिस्चार्ज देण्यात आला. १४ एप्रिलला ठाण्यात राहणाऱ्या या चिमुकल्याची आणि त्याच्या आईची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात आईची चाचणी निगेटिव्ह आली, मात्र बाळाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
यानंतर ठाण्यातील सिव्हील रुग्णालयामध्ये बाळाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यावर बाळाला रविवारी डिसचार्ज देण्यात आला. यावेळी ठाणे सिव्हील हॉस्पिटलमधील सर्व नर्स, डॉक्टर, आणि कर्मचाऱ्यांनी बाळाला टाळ्या वाजवून निरोप दिला. बाळाला कोरोनाची लागण कोणामुळे झाली हे अद्यापही समोर आले नाही.