ठाणे - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण मंडळाने याही वर्षी शाळा सुरू होण्याच्या तोंडावर शासनाच्या परवानगीशिवाय सुरू असलेल्या अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. यात सात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. या यादीनुसार कल्याणमधील ४, डोंबिवली १, टिटवाळ्यातील २ शाळांमध्ये प्रवेश घेवू नये, असे आवाहन महापालिकेच्या शिक्षण मंडळाने केले आहे.
येत्या १३ ते १५ जूनपासून शाळा सुरू होणार असून या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच महापालिका, नगरपालिकांनी अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत शासनाच्या परवानगीशिवाय सुरू असलेल्या सात शाळा अनधिकृत असल्याची यादी शिक्षण मंडळाने जाहीर केली आहे. शासनाची कोणतीही परवानगी न घेता बिनधास्तपणे शिक्षणाचा बाजार या शाळानी मांडला आहे. नर्सरीपासून पाचवीपर्यंत या शाळांमध्ये वर्ग सुरू आहेत.
या शाळांचा आहे समावेश -
कल्याण पश्चिमेतील स्मॉल वंडर प्रायमरी स्कुल, दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कुल, इकरा इंग्लिश स्कुल, कल्याण पूर्वेतील पॅसिफिक ग्लोबल स्कुल, दि माउंट व्ह्यू स्कुल, टिटवाळा येथील लिटिल वंडर प्रायमरी स्कुल, अपोस्टलीक इंटरनॅशनल स्कुल या शाळांचा समवेश आहे.
विशेष म्हणजे, या सातही शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यास शासनाकडून परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते, हे टाळण्यासाठी अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यासाठी प्रवेश घेवू नये, असे आवाहन कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण प्रशासन अधिकारी यांनी केले आहे.