ठाणे- शहरात कोरोनाचे वाढत असलेले संकट पाहता टेस्ट करण्यासाठी सर्व आवश्यक यंत्रणांनी परिपूर्ण अशा लॅब्सची व्यवस्था असणे गरजेचे आहे. मात्र, शहरात अद्ययावत टेस्टिंग लॅब्सचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे, शासनाने खासगी लॅब्सना कोरोना विषाणूची चाचणी करण्याची परवानगी द्यावी यासाठी मंत्री जितेंद्र आव्हाड पाठपुरावा करत होते. त्यांचा प्रयत्नांना यश आले असून ठाणे वागळे इस्टेट येथील 'इन्फेक्शन्स लेबॉरटरी'ला कोरोना विषाणूची (कोविड-१९) चाचणी करण्याची शासनाकडून परवानगी मिळाली आहे.
'इन्फेक्शन्स लेबॉरटरी' मध्ये उच्च दर्जाच्या आधुनिक मशिनरी आहेत. लॅबमध्ये जवळपास १००० पेक्षा जास्त विषाणू चाचण्या करण्याची व्यवस्था आहे. या लॅबला स्वत: पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली होती. लॅबमधील आधुनिक व्यवस्था पाहून शिंदे यांनी त्याची प्रशंसा केली होती. जितेंद्र आव्हाड यांनी देखील लॅबला भेट देऊन शहानिशा केली. त्यानंर आव्हाड यांनी खासदारांशी बोलून या लॅबला कोरोना विषाणूची चाचणी करू देण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानंतर 'इन्फेक्शन्स लेबॉरटरी'ला कोरोना विषाणूची चाचणी करण्याची परवानगी मिळाली आहे. दरम्यान, आव्हाड यांनी चाचणीची किंमत ४ हजार ५०० रुपये असून ती सामान्यांना परवडणार नसल्याने किंमत कमी करावी, अशी विनंती आपण केंद्र शासनाला केली असल्याचे सांगितले.
हेही वाचा- संचारबंदी असतानाही घराबाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांच्या दंडुक्यांचा प्रसाद