ठाणे - कल्याण पंचायत समितीच्या इमारतीच्या छताचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यावेळी कुणी ये-जा करत नव्हते. त्यामुळे कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र, या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
हेही वाचा - कल्याणमध्ये मित्राच्या भांडणामध्ये मध्यस्थी करण्यास गेलेल्या तरुणाचा खून
कल्याण पश्चिमेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानालगत कल्याण पंचायत समितीच्या कार्यलयाची इमारत १९६२ साली उभारण्यात आली आहे. मात्र काही वर्षांपूर्वीच धोकादायक इमारतींच्या सर्व्हेमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने ही इमारत धोकादायक जाहीर केली असून या इमारतीची डागडुजी करण्याचे आदेश देण्यात आले होते. चार वर्षांपूर्वी पंचायत समितीच्या इमारतीच्या रंगरंगोटी व दुरुस्तीवर ५० हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तेव्हापासून अनेकदा या इमारतीची डागडुजी करण्यात येत आहे. तरी देखील या इमारतीची पडझड सुरूच असल्याचे आजच्या घटनेतून समोर आले आहे.