ठाणे - रेल्वे स्थानकातच असलेले 'वन रुपी क्लिनिक' रेल्वे प्रवाशांसासाठी जीवनदायी ठरत आहे. या क्लिनिकने आतापर्यंत प्रसुती वेदना सुरू झाल्याने अडलेल्या ७ महिलांचे सुखरुप बाळांतपण केले आहे. आज पहाटे कोकणकन्या एक्स्प्रेसने प्रवास करत असलेल्या २० वर्षीय पूजा मुन्ना चव्हाण या गर्भवती महिलेला जर तत्काळ मदत मिळाली नसती तर ते तीच्या जिवावरही बेतले असते.
या महिलेला प्रवासादरम्यान अचानक प्रसूती वेदना सुरु झाल्या. पहाटेची वेळ असल्याने काय करावे, अशा विवंचनेत असतानाच तिच्या कुटुंबीयांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनी त्वरित ठाणे रेल्वे स्थानकातील वन रुपी क्लिनिकशी संपर्क साधला. ही ट्रेन ठाणे स्थानकात येताच क्लिनिकचे डॉक्टर ओंकार व डॉक्टर पूजा यांनी त्वरित धाव घेतली असता समोरचा प्रकार पाहून त्यांना धक्काच बसला. ट्रेनच्या शौचालयातच महिलेची प्रसूती होत होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉक्टरांनी तिला लगेच वन रुपी क्लिनिकमध्ये आणले आणि तिची प्रसूती केली.
डॉक्टरांच्या तत्परतेमुळे आई आणि बाळाचे प्राणी वाचविण्यात यश आले. गेल्या काही दिवसात वन रुपी क्लिनिक ने ७ महिलांच्या सुखरूप प्रसूती केल्या आहेत. त्यात ठाणे केंद्रातच ४ प्रसूती झाल्या आहेत. अशाप्रकारे हे क्लिनिक रेल्वे प्रवाशांसाठी वरदान ठरत आहे. क्लिनिकचे संचालक राहुल घुले यांनी क्लिनिक सुरू करण्यास मदत केल्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे आभार मानले. प्रवाशांना या क्लिनिकमध्ये सेवा घेण्यासाठी नाममात्र एक रुपया आकारला जातो, त्यामुळे गरिबांसाठी हे रुग्णालय वरदान ठरत आहे.