ठाणे - जिल्ह्यासह भिवंडीत देखील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. शहरातील निझामपुरा येथील आणखी एका ५८ वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आज मंगळवारी समोर आली आहे. हा रुग्ण वेतळपाडा येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासोबत मालेगाव येथून परतला होता. त्यावेळी त्याला क्वारंटाईन करण्यात आले होते. आज त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे भिवंडीत कोरोनाबाधितांची संख्या २२ वर पोहोचली आहे. यापैकी १२ रुग्ण शहरात, तर १० ग्रामीण भागात आहेत.
शहरातील वेताळपाडा येथे काही दिवसांपूर्वी 53 वर्षीय व्यक्ती आपल्या इतर सहकाऱ्यांसह मालेगाव येथून भिवंडीत आला होता. या रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात पाठविले होते. त्याच्या कुटुंबातील व्यक्तींसह प्रवाशांना भिवंडी क्वारंटाईन केंद्रात पाठविण्यात आले होते. तसेच वेताळपाडा परिसर देखील मनपा प्रशासनाने सील केला होता.
मालेगावहून आलेल्या या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या घरातील त्याची 45 वर्षीय पत्नी आणि त्याची 23 वर्षीय सून, अशा दोन महिलांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते. आज (मंगळवारी) या रुग्णासोबत मालेगावहून आलेल्या निझामपुरा येथील रहिवासी असलेला एका 58 वर्षीय व्यक्तीचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला असून या रुग्णाला उपचारासाठी इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती भिवंडी मनपा प्रशासनाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. जयवंत धुळे यांनी दिली आहे.
भिवंडी शहर व ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. भिवंडी शहर व ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची संख्या आता 22 वर पोहोचली आहे. भिवंडीकरांसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे.