ठाणे - अंबरनाथ पालिका प्रशासनाने कोरोना मुक्तीची घोषणी केल्यानंतरही आज १ पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्यामुळे शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे. शहरातील खुंटवली भागातील ३० वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे.
अंबरनाथ शहर कोरोनामुक्त झाल्याचे कालच पालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. या घोषणेला २४ तासांचा कालावधी उलटत नाही तोच शहरातील खुंटवली भागातील ३० वर्षीय व्यक्ती कोरोना पॉसिटीव्ह आढळला आहे. हा रुग्ण मुंबईच्या ताज हॉटेलमधील सिक्युरिटी गार्ड असल्याचे समोर आले आहे.
अंबरनाथ शहरातील तिन्ही कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना रुग्णलयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी शनिवारी दिली होती. अंबरनाथ शहर कोरोनामुक्त झाल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र, शहर कोरोनामुक्तीच्या घाई घाईने केलेली घोषणा फोल ठरल्याने पालिका प्रशासना विरोधात नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रया उमटल्या आहेत.
गेल्या काही दिवसापूर्वी अंबरनाथ शहरात कोरोना बाधित एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. हा मृत व्यक्ती लॉकडाऊनपूर्वी उत्तरप्रदेशमधून आला होता. शिवाय या रुग्णांच्या संपर्कातील नातेवाईक आणि इतर संशयीत ३८ रुग्णांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, या मृत रुग्णांच्या निकट नातेवाईकांपैकी २ जण पॉझिटिव्ह आढळून आले होते. आजही शहरातील १० नागरिक होम कॉरंटाईन असून, इतर ६ जण विलगिकरण कक्षात आहेत. शिवाय आणखी काही संशयित रुग्णांचे अहवाल येणे प्रलंबित असल्याची माहिती अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी शनिवारी दिली होती. आणखी काही संशयित रुग्णांचे अहवाल येणे प्रलंबित असताना तसेच अंबरनाथ शहरात कोरोना बाधित एका रुग्णांचा मृत्यू झाला असताना शहर कोरोना मुक्त म्हणणे घाईचे होईल, अशी चर्चा नागरिक करत आहेत.