ठाणे : ॲपेक्स रुग्णालयासमोरील रस्त्यावर ७० वर्षीय वृद्धाचे दागिने पळवल्याची घटना घडली आहे. दत्ताराम भिकाजी पार्टे (वय ७०, रा. साजन हाईट्स, गरीबाचापाडा, डोंबिवली) असे भामट्यांनी लुबाडलेल्या वृध्दाचे नाव आहे. दत्ताराम पार्टे बाजारातून पायी घरी जात असताना दोन भामट्यांनी त्यांना हेरून त्यांच्या दागिन्यावर डल्ला मारला आहे. या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
सोनसाखळी हिसकावून घटनास्थळावरुन पळ : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटेच्या सुमारास दत्ताराम पार्टे हे डोंबिवली पश्चिमेतील घनश्याम गुप्ते रोडवरील ॲपेक्स हॉस्पिटलसमोरील रस्त्यावरुन जात होते. त्याचवेळी अॅपेक्स हॉस्पिटलसमोर दोन अज्ञातांनी दत्ताराम यांना अडवले. श्रावण महिना सुरू असल्याने त्यांना भामट्यांनी बोलण्यात गुंतवून ठेवले. तसेच त्यांना ओम नमः शिवायचा जप करण्यास सांगितले. त्यानंतर दत्ताराम यांना भामट्यांनी संमोहित करुन त्यांच्याकडील 50 हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून घेत घटनास्थळावरुन पळ काढला.
विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा : दत्ताराम भिकाजी पार्टे यांना भामट्यांकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी विष्णुनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. तेथे पोलिसांनी पार्टे यांची तक्रार नोंदवत दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे अशीच घटना दोन महिन्यांपूर्वी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरात घडली होती. बहुतेक भुरटे चोर हे डोंबिवली शहर परिसरात असलेल्या बेकायदा झोपड्यामध्ये राहतात असा आरोप स्थानिकांनी केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक लोखंडे करीत आहेत.
हेही वाचा -
Murder News : जास्त वीजबिलाचा धसका, ग्राहकाने केला मीटर रीडरचाच खून