ठाणे : मुंबईच्या दर्ग्यावरील कारवाईनंतर मुंब्रा परिसरातील वनविभागाच्या जागेवर असलेल्या दर्गा, मजार याच्यावर कारवाईचा अल्टिमेटम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव यांनी दिला. सध्या मुस्लिम समाजाचा रमजान महिना सुरु आहे. त्यामुळे धार्मिक तेढ किंवा कायदा, सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता असल्याने सहाय्यक पोलीस आयुक्त विलास शिंदे यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४४ कलम लागू करण्यात आलेला आहे.
जाधव यांना मुंब्य्रात नो एन्ट्री : मुंब्रा पोलीस ठाण्याचे परिसरातील नागरिकांच्या जिवितास, मालमत्तेस धोका असुन तेथील सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था बिघडण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. मनसेचे अविनाश जाधव यांच्या अल्टिमेटमने मुस्लिम समुदाय संतप्त आहे. त्यामुळे मनसे नेते अविनाश जाधव याना मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९ एप्रिल पर्यंत ठाणे पोलिसांनी 'नो एन्ट्री' करण्यात आलेली आहे. सदरचे आदेश सोमवारी (२७ मार्च) रोजी कळवा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शिंदे यांनी दिले आहेत. या आदेशाची प्रत मनसे नेते अविनाश जाधव यांनाही दिले आहेत. आदेश झुगारून मुंब्रा हद्दीत प्रवेश केल्यास जाधव यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशाराही या नोटीसमध्ये दिला आहे.
पोलीस ठाण्याला छावणीचे स्वरूप : राज ठाकरेंच्या एल्गारामुळे ठाणे मनसेने दिलेला अल्टिमेटममुळे मुंब्रा बहुमुस्लिम परिसरात वातावरण संतप्त झाले. रमजानच्या महिन्यात मुस्लिमांच्या भावना दुखावून भडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करा. त्यांना मुंब्रा हद्दीत प्रवेश बंदी करा या मागणीसाठी मुस्लिम समुदाय पोलीस ठाण्याच्या आवारात मोठ्या संख्येने जमत आहेत.
अविनाश जाधव यांना प्रवेश बंदी : सोमवारी संध्याकाळी परिमंडळ पोलीस उप आयुक्त गणेश गावडे यांनी मुस्लिम जनसमुदायाच्या भेट घेऊन कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही. तसेच कायदा, सुव्यवस्था अबाधित राहील तसेच मुंब्रा विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी त्वरित १४४ कलमाची नोटीस अविनाश जाधव यांना बजावण्यात आली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत अविनाश जाधव यांना प्रवेश बंदी करण्यात आली. उप आयुक्त गावडे यांच्या भूमिकेने मुस्लिम समुदायाचे समाधान झाले असुन जमाव निघून गेला आहे. दरम्यान मुंब्र्यात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे.