ठाणे - बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ९ वर्षीय अल्पवयीन पोटच्या मुलीवरच ४९ वर्षीय नराधम बापाने अत्याचार केला. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून आरोपी बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
अंघोळ घालण्याच्या बहाण्याने बाथरुममध्ये अत्याचार -
डोंबिवली पश्चिमेतील विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी बाप हा पत्नी व दोन मुली सोबत राहतो. ऑक्टोबर महिन्यात पत्नी गावी गेली असता आरोपी बापाने पीडित मुलीला अंघोळ घालण्याच्या बहाण्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. त्यांनतर आई गावावरून आल्यावर पीडित मुलीने आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला असता आईने सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र पीडित मुलगी सतत रडत असल्याचे पाहून आईने मुलीला विश्वासात घेत नक्की काय घडले विचारले असता पीडित मुलीने तिच्यावर घडलेला प्रसंग सांगताच आईला धक्काच बसला होता. त्यानंतर आईने आरोपी पतीला घडलेल्या घटनेचा जाब विचारला असता ती लहान आहे असे सांगून त्याने पत्नीलाच धमकी देऊन गप्प केले.
पीडित मुलीसोबतच ८ महिन्याच्या मुलीलाही पाजत असे दारू -
ऑक्टोबर महिन्यातच पुन्हा एका दिवशी बेडरूममधून मुलीच्या रडण्याचा आवाज आल्याने आईने विचारले असता नराधम बापाने दरवाजा न उघडता आईला झोपण्यास सांगितले. त्यानंतर सकाळच्या सुमारास आईने पीडित मुलीला रात्री काय झाले का रडत होती विचारले असता पीडित मुलीने बापाच्या कृत्याच्या पापाचा पाढाच वाचला होता. त्यानंतरही आरोपी बापाने पीडित मुलीसोबतच ८ महिन्याच्या मुलीला दारू पाजणे, पत्नीला बेदम मारहाण असे प्रकार सुरू ठेवल्याने अखेर आईने शुक्रवारी विष्णूनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडत असलेल्या प्रसंगाचे कथन केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी बापाविरोधात भादंवि कलम ३७६ (अ ) (ब ) ३५४ (अ ) ३२३, ५०६, ५०४ सह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून काही तासातच त्याला अटक केली आहे. आरोपी बापाला आज (शनिवार) कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे.
हेही वाचा - भिवंडीत माथेफिरुने दोघांची केली हत्या, आरोपीस अटक