नवी मुंबई - शहरात सध्या अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांची दिवसागणिक संख्या वाढली असून गर्दुल्ल्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. हे गर्दुल्ले आता खुलेआम मारामारी करणे तसेच प्रवाशांना हटकत असल्याने धोका वाढत चालला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसोबत महिला वर्गातदेखील भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.
नवी मुंबई शहरात मोठ्या प्रामाणावर अंमली पदार्थ विकले जात आहेत. यात गांजा आणि ड्रग्ससारख्या पदार्थांचा समावेश आहे. महाविद्यालयात जाणारी तरूणाई तसेच नागरिकही मोठ्या प्रमाणावर या अंमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत. हे अंमली पदार्थ सेवन करण्यासाठी शहरतील निर्जन स्थळ, उद्यान, रेल्वे स्थानक, बंद पडलेली बांधकामे महावितरण विद्युत ट्रान्सफर्मार रूम उड्डाणपुला खालीची ठिकाणे हे गर्दुल्ल्यांचे अड्डे बनत चालले आहेत. काही दिवसांपासून नवी मुंबईतील रेल्वे स्थानक परिसरात ही या गर्दुल्ल्यांची संख्या वाढत चालली आहे. या गर्दुल्ल्यांचा स्टेशन परिसरात उपद्रव वाढत चालला आहे. या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना हे गर्दुल्ले हटकत असतात. वरचेवर यांच्यात हाणामारी देखील सुरू असते. शुक्रवार ६ डिसेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता दोन गर्दुल्ल्यांमध्ये तुफान हाणामारी झाली, यातील ऐकाने तर हातात धारधार सुरा पकडला होता. हे भांडण सुरू असताना दोघांनाही शुध्द नव्हती. त्यामुळे जर यांच्या हातातील सुऱ्याने कुणावर वार झाला असता तर मोठा अनर्थ झाला असता. रात्रीच्या वेळी तर या गर्दुल्ल्यांकडून आणखी त्रास होत असतो.
एखाद प्रवासी एकटा दिसला तर पैशासाठी त्याला मारहाण करतात व पैसे हिसकावून घेण्याच्या घटनाही घडल्या आहेत. दिवसा-रात्री अशाप्रकारे गर्दुल्ले हैदोस घालत असतील तर महिलांनी बाहेर पडावे कसे? असा सवाल महिला प्रवासी विचारत आहेत. त्यामुळे पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरात आपली गस्ती वाढवावी किंवा कायम स्वरूपी एक वाहनासहित पथक या ठिकाणी दिवस रात्र तैनात ठेवावे, अशी मागणी महिला प्रवासी करत आहेत. रेल्वे स्थानक परिसरात जर अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या गर्दुल्ल्यांचा उपद्रव वाढला असेल तर त्यांच्या वर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येतील व त्या ठिकाणी पोलीस गस्ती वाढवण्यात येईल, असे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त, सतीश गोवेकर यांनी सांगितले.