ठाणे - मुंबई महापालिकेचा कामगार ते आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेतील विजेते गोपीनाथ सोना पवार यांच्या पदरी निराशाच आली आहे. शहापुरातील आसनगाव परिसरात राहणारे पवार यांनी वयाच्या ६३ व्या वर्षापर्यंत विविध स्तरावरील २१ पदके जिंकली आहेत. पंरतु त्यांची दखल राज्य सरकारने अद्यापपर्यंत घेतलेली नाही.
मुंबई महापालिकेचा कामगार ते आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. परंतु, या खेळाडूला महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा क्षेत्रातील पुरस्कारापासून वंचित राहावे लागले आहे. गोपीनाथ पवार यांनी मुंबई महापालिकेत कामगार असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर पॉवर लिफ्टरमध्ये २१ पदके मिळविली आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील ४ सुवर्ण, ७ रौप्य, तर ५ कांस्यपदकाची लयलूट केली आहे.
मुंबई महानगरपालिकेत कामगार म्हणून सेवेत असलेले गोपीनाथ पवार यांना लहानपणापासूनच पॉवरलिफ्टींगची आवड असल्याने त्यांनी आपली नोकरी सांभाळून खेळाकडे अधिक लक्ष दिले. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करून देखील महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाकडून आजपर्यंत एकही पुरस्कार न मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या कामगिरीची दखल राज्य शासनाने घ्यावी याकरता शहापुरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी त्यांची भेट घेतली. उत्तम खेळाडूकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यांना राज्य शासनाच्या वतीने मानाचा 'शिवछत्रपती पुरस्कार' मिळावा, यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी सांगितले.