ठाणे - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. यातच ठाण्यातील एका इमारतीतून लाखो रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. ठाणे पोलीस आणि निवडणूक विभागाने ही कारवाई संयुक्तरित्या केली आहे. कासारवडवली येथील वाघबीळनजीकच्या पुष्पांजली सोसायटीतील ए विंगमधील 301 या सदनिकेतून सुमारे 53 लाख 46 हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली.
हेही वाचा- ऑनलाईन कॅम्पेनद्वारे देणगी मिळवण्यात 'वंचित' सर्वात आघाडीवर
निवडणूक विभागाच्या आचारसंहिता कक्षाने जप्त केलेली सदरची रोकड आयकर विभागाकडे जमा करण्यात आली आहे. या कारवाईबाबत पोलिसांनी माहिती देण्यास नकार दिला आहे. मात्र, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.चारुशीला पंडित यांनी या कारवाईला दुजोरा दिला आहे. दरम्यान, सदरच्या सदनिकेवर राजू खरे यांचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मुंबईच्या जेजे रुग्णालयातून वैद्यकीय तपासणी करुन ठाणे कारागृहात परतत असलेले आर्थिक घोटाळ्यातील राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांचाही या रोकडशी संबंध आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरु होते. मात्र, राजकीय दबाव असल्यामुळे पोलिसांनी अधिक माहिती देणे टाळले. जर योग्य पद्धतीने तपास झाला असला तर काही पोलीस कर्मचारी निलंबित देखील होवू शकतात.