ठाणे - कामावरून घरी परतणाऱ्या आदिवासी विवाहित महिलेवर पाशवी बलात्कार करून तिची साडीने गळा आवळून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या संतापजनक घटनेला चार दिवस उलटूनही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्यावतीने भिवंडी तहसील कार्यालयावर शेकडो महिलांनी आक्रोश मोर्चा काढला. आरोपींना अटक करण्यासाठी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करीत तहसीलदारांना निवेदन सादर केले.
सदर महिला ही भिवंडी तालुक्यातील आहे. १५ सप्टेंबरला सायंकाळी साडेसात वाजता ही महिला कामावरून महाळुंगे बस स्टॉपवरून घरी जात होती. त्यावेळी निर्जन रस्त्यावर काही नराधमांनी तिला गाठून झुडपात नेवून तिच्यावर पाशवी बलात्कार केला. तिचा साडीने गळा आवळून खून केला. या घटनेमुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गणेशपुरी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा -संतापजनक! आदिवासी विवाहितेची सामूहिक बलात्कार करून हत्या
या घटनेला चार दिवस उलटूनही आरोपींना पकडण्यात अपयश आले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या श्रमजीवी संघटनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख जया पारधी, शेतकरी सेलच्या जिल्हा प्रमुख संगीता भोमटे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला व श्रमजीवी कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देत बुधवारी दुपारी भिवंडी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. या वेळी महिला व श्रमजीवी कार्यकर्त्यांनी आक्रोश व्यक्त करीत रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केले.
हेही वाचा -भिवंडीत तरुणाची हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचा संशय
श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी "आदिवासी कष्टकरी, ढोर नाय, माणूस हाय!, माणूसकीची भिक नको, हक्क हवा, हक्क हवा !" अशा गगनभेदी घोषणा देत परिसर दुमदुमून सोडला होता. यावेळी मृत आदिवासी महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा, सदरचा गुन्हा फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून फाशी द्या, महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालय, बस स्टॉप व कंपनी आस्थापनेच्या ठिकाणी पोलीस गस्त सुरू करावी, महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस पाटील व तंटामुक्त समिती प्रमुखांना विशेष अधिकार देण्यात याव्यात, अशा विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे तहसीलदार शशिकांत गायकवाड यांच्याकडे श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळाने सुपूर्द केले.
हेही वाचा- ठाणे महापौर मीनाक्षी शिंदे यांना कुख्यात गुंडाकडून धमकीचा फोन
यावेळी प्रदेश सरचिटणीस बाळाराम भोईर, जिल्हा सचिव अनिता वाघे, तालुका प्रमुख वैशाली पाटील, स्वाती शिंदे, कविता कदम, आशा भोईर, लक्ष्मी मुकणे, कमल जाधव आदी महिला पदाधिकाऱ्यांसह श्रमजीवी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.