ठाणे : जिल्ह्यातील कल्याण-नगर, भिवंडी-वाडा, कल्याण-शीळ मार्गही पाण्याखाली गेल्याने शेकडो वाहने अडकून पडली आहेत. तर बदलापूर अंबरनाथ रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे हजारो प्रवाशी रेल्वे स्थानकात अडकून आहेत. जिह्यातील पावसाची नोंद पाहता सर्वाधिक उल्हासनगर आणि अंबरनाथ तालुक्यात नोंद झाली आहे.
अनेक वाहने पाण्यात अडकून पडली : गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. तसेच शेकडो नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. या मुसळधार पावसाचा सर्वाधिक परिणाम रेल्वेसह जिल्ह्यातील प्रमुख मार्गवरील वाहतुकीवर झाला आहे. तर हजारो वाहने पाण्यात अडकून पडली आहेत. जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा कहर पाहता भिवंडी, कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, अंबरनाथ, टिटवाळा, उल्हासनगर, बदलापूर शहरी भागासह ग्रामीण भागातील बहुतांश सखल भाग जलमय झाला आहे. तर हजारो नागरिकांच्या दुकानासह घरातील संसरोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. तसेच अनेक मार्गावर पावसाच्या पाण्यात अडकून हजारो वाहने बंद पडल्याने, चालकांची पाण्यातून वाहन काढताना दमछाक सुरूच आहे.
अनेक गावाचा संपर्क सुटला : बदलापूर आणि मुरबाड तालुक्यातील गावांना सर्वाधिक पावसाचा फटका बसला आहे. अंबरनाथ बदलापूर तालुक्यातील सोनिवली व हेंद्रेपाडा येथील सुमारे 200 कुटुंबांना बदलापूर येथील बीएसयूपी इमारतीमध्ये हलविण्यात आले आहे. सोनिवली येथील यादवनगर भागातील लोकांना म्हाडा कॉलनी सोनिवली या ठिकाणी शिफ्ट करण्यात येत आहे. रायते ते दहागाव मार्गावरील उल्हास नदीवरील पुलावर पाणी गेले आहे. मुरबाड तालुक्यातील चिखले गावाला जाणाऱ्या काळू नदीवरील पुलावरून पाणी गेल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला आहे.
सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली : जिल्ह्यात सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली तर मुरबाड तालुक्यातील मुरबाडी नदीवरील पुलावरूनही पाणी जात असल्याने, या भागातील ५० हून अधिक गावाचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन व महसूल यंत्रणा कार्यरत आहे. शिवाय अंबरनाथ येथील सहवास वृद्धाश्रम मधील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. मुरबाडवरून वाशिंदकडे जाणारा चिखले पूलही पुराच्या पाण्याखाली गेला आहे. तर १२ ते १५ गावाचा संर्पक तुटला आहे. भिवंडी शहर ग्रामीण भागातही मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. जिल्ह्यात सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नदी खाडी, ओढे या लगतच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा -