नवी मुंबई - माघी गणेश चतुर्थी निमित्त नवी मुंबई परिसरात टाळ-मृदंगाचा गजर, बाप्पाच्या नावाचा जयघोष, महापूजा, आरती, महाप्रसाद, पालखी सोहळा अशा भक्तिमय वातावरणात साजरा झाला. शहरातील विविध गणेश मंदिरांमध्ये अभिषेक, महापूजा, महाआरती, महाप्रसादाचे वाटप अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल दिवसभर चालू होती. पहाटेच्या आरतीपासून ते सायंकाळी निघणाऱ्या बाप्पाच्या पालखी सोहळ्यात भाविकांची अलोट गर्दी बघायला मिळाली.
हेही वाचा - आधीच्या सरकारने व्यावसायिकांच्या फायद्यासाठी राबविले घरांचे धोरण - जितेंद्र आव्हाड
सर्व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या उरणमधील चिरनेर महागणपती, धाकटा खांदा, कोपर, तसेच नवी मुंबई शहरातील गणपती मंदिराबाहेर माघी गणेशोत्सवानिमित्त भाविकांची रिघ लागली होती. हातात फुलांच्या माळा, आरतीचे ताट घेऊन महिला भाविक तासनतास रांगेत उभ्या होत्या. तसेच मंडळाचे व घरगुती गणपतींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. मंगळवारी पहाटे ४ वाजल्यापासूनच शहर, परिसरातील ठिकठिकाणच्या गणपती मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. भक्तिगीते आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.
संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रत्येक मंदिराच्या वतीने मंडप, महिला-पुरुष रांगांची सोय करण्यात आली होती. हार, दुर्वा, फुलं अन्य पूजेचे साहित्य विक्री करणारे स्टॉलही मोठ्या प्रमाणात होते. ठिकठिकाणी लाडू, पेढा, खोबऱ्याची वडी इत्यादी प्रसादाचे वाटप चालू होते. चिरनेर परिसरातही दर्शन घेणाऱ्या भाविकांची गर्दी होती.
हेही वाचा - अकरावीच्या विद्यार्थ्याचा झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, हत्या की आत्महत्या?