ठाणे - भिवंडीत आज (गुरुवार) शहरात एकाच दिवसात कोरोनाचे तब्बल 43 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ग्रामीण भागात 19 नवे रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात व शहरात एकूण 62 नवे रुग्ण आढळले आहेत. शहरात रोज कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून, मनपा प्रशासनाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे.
वाढत्या कोरोना रुग्णांमुळे रुग्णांना उपचार करण्यात देखील मनपा प्रशासन हतबल ठरले आहे. आतापर्यंत शहरात 21 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मनपाच्या हलगर्जीपणामुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूसंख्येत वाढ होण्याची भीती निर्माण झाली आहे. तर भिवंडी शहरात आतापर्यंत 396 रुग्ण आढळले असून, त्यापैकी 154 रुग्ण बरे झाले आहेत. तर 21 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून 221 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.
ग्रामीण भागात आतापर्यंत 209 रुग्ण आढळले असून, त्यापैकी 92 रुग्ण बरे झाले आहेत. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला असून 113 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. आज आढळलेल्या 62 नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील शहर व ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 605 वर पोहोचला आहे. त्यापैकी 246 रुग्ण बरे झाले आहेत तर 25 रुग्णांचा मृत्यू झाला असून 334 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.
दरम्यान, पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी मात्र मृत कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यविधीवेळी मृतदेहाला नागरिक हात लावत असल्याने शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाचा शासनाच्या नियमानुसार अंत्यविधी करावा असे आवाहन केले होते. मृतदेहाला स्पर्श करणे, आलिंगन देणे अशा तक्रारी पालिका प्रशासनाकडे आल्याचे सांगून पालिका आरोग्य विभागाकडून होणाऱ्या हलगर्जीपणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. तसेच शहराबाहेरून येणाऱ्या कोरोनाबाधित मृतदेहालाही शहरात आणता येत नाही. त्यांचा मृतदेह शहरात आणण्याचा आग्रह नातेवाईकांनी धरू नये, असेही पालिका आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांनी सांगितले.