ठाणे- ठाणे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोविड-१९च्या सद्यस्थितीची माहिती नागरिकांना आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. कोरोनाच्या अनुषंगाने पालिकेच्या वतीने माहिती देणारा डॅशबोर्ड विकसित करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या संकेतस्थळासह सोशल मीडिया हँडल फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामशी जोडलेले असून सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
हेही वाचा- Global COVID-19 Tracker: जगभरात ३१ लाख ३८ हजार बाधित, तर २ लाख १७ हजार ९८५ दगावले
या डॅशबोर्ड ला भेट देण्यासाठी https://kdmc-coronavirus-response-skdcl.hub.arcgis.com/ या लिंकवर क्लिक करावे. ‘डॅशबोर्ड’चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ड्रॉप मेनूचा उपयोग करुन नागरिकांना कोणत्याही मतदार प्रभाग व त्यातील संबंधित ग्राफमध्ये कोविड परिस्थितीची स्थिती जाणून घेता येईल. शहराच्या स्थानिक नकाशावर संबंधित प्रभागांवर क्लिक करुन नागरिकांनाही माहिती मिळू शकते. डॅशबोर्ड उपग्रह दृश्य, रस्ता नकाशा इत्यादी पर्यायांमधून पार्श्वभूमी बेस नकाशा बदलून नकाशे पाहण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
नागरिकांनी अचूक व अधिकृत माहितीसाठी या डॅशबोर्डचा वापर करावा. अफवा अथवा अर्धवट माहितीवर विश्वास ठेवू नये. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने मनपा प्रशासन प्रभावी उपाययोजना करीत आहे. नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन सूर्यवंशी यांनी केले आहे.